‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या नावाखाली बनावट योजना सादर करुन ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मात्र, कंपनीकडून अशा प्रकारच्या कोणत्याही योजना देण्यात आलेल्या नाहीत. अशा प्रकारे कोणी संपर्क साधला तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, सरळ पोलिसांत तक्रार दाखल करा, असे आवाहन खुद्द ‘टाटा मोटर्स’कडूनच करण्यात आले आहे.
टाटा मोटर्सच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा गैरवापर करून फसवणुकीच्या अनेक घटना घडल्याचे अलीकडच्या काळात उघडकीस आले आहे. ‘टाटा मोर्टर्सकडे ठेवलेल्या ठेवीच्या बदल्यात टाटा मोटर्सची चारचाकी देणार’, ‘लकी ड्रॉ, बक्षिसे मिळवण्यासाठी ठराविक रक्कम टाटा मोटर्सक डे भरा’, ‘सिनेअभिनेते ओळखा, मोटार जिंका’ यांसारख्या बनावट योजना सादर करण्यात येत आहेत. त्यासाठी इमेल, एसएमएस आणि टीव्हीवरील जाहिरातींचा वापर करण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करा, असे सांगून लोकांकडून पैसे घेण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून आर्थिक नुकसानही होत आहे.
मात्र, ‘अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही आणि कोणत्याही व्यक्तीला या प्रकारे पैसे घेण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत,’ असे स्पष्टीकरण ‘टाटा मोटर्स’च्या वतीने देण्यात आले आहे. या संदर्भात टाटा मोटर्सकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्राहकांनी अशा बोगस योजनांना बळी पडू नये तसेच फसवणूक झाली असल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन ‘टाटा मोटर्स’च्या वतीने करण्यात आले आहे.
 
‘टाटा’चे नाव, मोटारींच्या नावांचाही गैरवापर
‘टाटा मोटर्स लिमिटेड’ हे कंपनीचे नोंदणीकृत नाव, तसेच कंपनीच्या ‘टाटा सफारी’ या मोटारीचे नाव अनधिकृतपणे वापरले जात आहे. त्याद्वारे या लोकांकडून बौद्धिक मालमत्ता हक्क कायद्याचा भंग करण्यात येत आहे, असेही टाटा मोटर्सतर्फे प्रसिद्धिस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.