कोथरूड गावठाण येथील ‘टीडीआर’ ची विक्री करायची असल्याचे सांगून व्यापाऱ्याकडून ४५ लाख घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाशमल शांतीलाल जैन (वय ६२, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संजय वसंत मांजरे व सुहास नानासाहेब उभे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील संगम चौकाजवळील जागेचा ‘टीडीआर’ विक्री करायचा असल्याचे सांगून आरोपींनी जैन यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. मात्र, महापालिकेने संपादित केली नसताना देखील आरोपींनी कोथरूड येथील सव्हे क्रमांक ८६/३ येथील जागेचा ‘टीडीआर’ विक्री करण्याचे सांगून ही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव विधाते हे अधिक तपास करत आहेत.