पॉलिसी काढण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची चौदा लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडीकीस आला आहे. याप्रकरणी भामटय़ांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपक बजाज, सीमा गुप्ता, समीर मल्होत्रा, गोपाळ उर्फ वैष्णव पाठक, आर्यन दीक्षित, अजय मेहता, सुनील डब्बास, मिनाक्षी अनिल ऐलावत अशी गुन्हा दाखल केलेल्या भामटय़ांची नावे आहेत. प्रभाकर श्रीधर उंडे यांनी यासंदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  उंडे यांनी खासगी कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांनी नोकरीत असताना काही रक्कम पॉलिसीत गुंतवली होती. सन २०१४ मध्ये भामटय़ांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि पॉलिसीची रक्कम परत देण्यात येणार आहे, अशी बतावणी केली. त्यावेळी भामटय़ांनी त्यांच्याकडून १४ हजार रुपये उकळले होते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत भामटय़ांनी पॉलिसीची रक्कम परत मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख दोन हजार १०० रुपये उकळले. उंडे यांना वेगवेगळ्या बँकेत पैसे भरण्यास सांगितले. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर उंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. उंडे यांच्याशी भामटय़ांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. प्रत्येकवेळी तुमची पॉलिसीत गुंतवलेली रक्कम मंजूर करण्यात आली आहे. पैसे भरावे लागतील, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. शहानिशा न करता उंडे यांनी ही रक्कम भामटय़ांनी सांगितलेल्या खात्यात भरली, असे उपनिरीक्षक कुलकर्णी  यांनी सांगितले.
उंडे यांच्याकडून पैसे उकळणारे भामटे परराज्यातील असावेत, असा संशय पोलिसांना आहे. उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.