इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय गोविंद धांडे (वय ५८, रा. पाषाण) यांची इंटरनेट बँकिंगद्वारे १९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पैसे काढण्याचा ‘एसएमएस’  मोबाईलवर जाऊ नये म्हणून चोरटय़ांनी अगोदरच धांडे यांचे सीमकार्ड बंद केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांडे यांचे औंध रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. या खात्यावर १९ लाख दहा हजार रुपये होते. गेल्या सोमवारी धांडे यांना बँकेतून दूरध्वनी आला. बँकेच्या खात्यावरील रक्कम दहा हजार रुपयांच्या खाली आली असून, ती रक्कम भरावी, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर धांडे यांना आपल्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचा प्रकार कळाला. चोरटय़ांनी बँकेचा सव्र्हर हॅक करून त्यांच्या खात्यावरील १९ लाख एक हजार रुपये काढून घेतले. धांडे यांची मोबाईल बँकींग सुविधा सुरू असल्यामुळे बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याचा संदेश मोबाईलवर येतो. पैसे काढल्याचा धांडे यांना एसएमएस जाऊ नये म्हणून चोरटय़ांनी काही दिवस अगोदरच त्यांच्या मोबाईलचे सीमकार्ड बंद केले होते. त्याबाबत धांडे यांनी चौकशीही केली होती. पण, बँकेकडून त्यांना फोन आल्यानंतरच हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत चतु:श्रुंगी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा तपास सायबर शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार हे अधिक तपास करत आहेत.