दिल्लीतील एका वर्तमानपत्राचा संपादक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार

पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. या गुन्ह्य़ातील म्होरक्या दिल्ली येथील एका वर्तमानपत्राचा संपादक असल्याची माहितीही समोर आली आहे. पकडलेल्या आरोपींकडून राज्यभरातील फसवणुकीचे जाळे उघड झाले आहे.

राजेशकुमार भगवानदास सोनी (वय ३५, रा. बी ५, संजयनगर, नवी दिल्ली), कमल शामलाल चौधरी (वय ३३, रा. ए. ४१, महेंद्र पार्क, नवी दिल्ली) या दोघांना बुधवारी पकडण्यात आले. न्यायालयाने त्यांना  पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गरिमा प्रेमकुमार पाहवा (वय २०, रा. बुनकर कॉलनी, भारतनगर, अशोक विहार, फेज ४, दिल्ली) हिला गुरूवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी गजानन विनायक वाघ (रा.गणेश नगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिल्ली येथील वर्तमानपत्राचा संपादक असलेला राकेश कुमार भारद्वाज हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फिर्यादी वाघ यांना पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रमाअंतर्गत आकर्षक सवलतीत कर्ज मिळवून देण्याचा संदेश मोबाइलवर मिळाला होता. त्यानुसार वाघ यांनी २२ लाख रुपये कर्जाची मागणी केली. आवश्यक ती सर्व कागदपत्रेही सांगितलेल्या ठिकाणी पाठवून दिली. त्यानंतर त्यांना कर्ज प्रकरणाची फाईल करण्यासाठी प्रक्रिया शुल्कासह वेगवेगळे शुल्क म्हणून पाच लाख ५२ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणतीही प्रक्रिया न झाल्याने वाघ यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांकडून याबाबत तपास सुरू असताना आरोपी दिल्लीतील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिल्लीतून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रमाअंतर्गत कर्जाची माहिती मोबाइल संदेशातून नागरिकांना पाठवित होते. मिहद्र कन्स्लटन्सी या कॉलसेंटरद्वारे ही योजना चालवित असल्याचे ते सांगत होते. त्यासाठी कागदपत्राबरोबरच वेगवेगळे शुल्क उकळण्यात येत होते. या प्रकारे त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे ६२ नागरिकांची अंदाजे एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शहरातच अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात अथवा सायबर क्राईम सेलकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. गुन्ह्य़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण स्वामी करीत आहे.