चेन्नई एक्सप्रेस रेल्वेमध्ये सोलापूर ते लोणावळा प्रवासादरम्यान दोन बोगीमधील पाच प्रवाशांच्या बॅगा आणि सोन्याचे दागिने असा आठ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये सर्वाधिक सोन्याचे दागिन्यांचा समावेश असून चोरटय़ांनी गुंगीच्या स्प्रेचा वापर केल्याचे प्रवशांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दादर येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुणे लोहमार्ग पोलिसांकडे दाखल केला आहे.
याबाबत योगेश गोवर्धन गिलानी (वय ५७, रा. मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून गुरुवारी रात्री हे प्रवाशी चेन्नई एक्सप्रेसने रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी बसले. पुणे ओलांडल्यानंतर लोणावळ्याजवळ या प्रवाशांना आचानक झोपेतून जाग आली. त्या वेळी त्यांच्या बॅगा आणि सोने चोरीला गेल्याचे आढळून आले. ‘ए वन’ बोगीतील तीन प्रवाशांचे बॅगा आणि सोने असे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज तर, ‘एस सात’ बोगीतील दोन प्रवाशांचा एक लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रवाशांनी मुंबईत गेल्यानंतर या प्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार दिली. त्या तक्रारीत त्यांनी चोरटय़ांनी त्यांच्यावर गुंगीच्या स्प्रेचा वापर केल्यामुळे त्यांना जाग आली नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुणे लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार हे अधिक तपास करीत आहेत.