14 October 2019

News Flash

लालचुटूक चेरीचा हंगाम सुरू!

चेरीला घरगुती ग्राहक तसेच किरकोळ विक्रे त्यांकडून चांगली मागणी आहे.

हिमाचल प्रदेशातील चेरी बाजारात दाखल

पुणे : लालचुटूक चेरीचा हंगाम सुरू झाला आहे. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात हिमाचल प्रदेशातून चेरीची आवक सुरू झाली असून प्रतवारीनुसार घाऊक बाजारात प्रतिकिलो चेरीला २०० ते २५० रुपये असा भाव मिळाला आहे.

चेरीची हंगामातील पहिलीच आवक रविवारी फळबाजारातील व्यापारी करण जाधव यांच्या गाळ्यावर झाली. हिमाचल प्रदेशातील फागू भागातून चेरीच्या साडेचारशे खोक्यांची आवक झाली. चेरीच्या मिशरी आणि मखमली या दोन जाती आहेत. मिशरी जातीची चेरी चवीला आंबट-गोड असते. साधारणपणे दोन दिवस मिशरी जातीची चेरी टिकते. मखमली जातीची चेरी चवीला गोडसर असते. यंदा पोषक हवामानामुळे हिमाचल प्रदेशात चेरीचे उत्पादन चांगले झाले असून भाव आवाक्यात आहेत, अशी माहिती करण जाधव यांनी दिली.

चेरीला घरगुती ग्राहक तसेच किरकोळ विक्रे त्यांकडून चांगली मागणी आहे. चेरीचा हंगाम आणखी पंधरा ते वीस दिवस सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

फळबाजारात सध्या रत्नागिरी हापूसची आवक मोठय़ा प्रमाणावर होत आहे. कोलकात्याहून लिची आणि हिमाचल प्रदेशातील चेरीची आवक फळबाजारात होत आहे. बाजारात आंब्यांची चलती असली तरी घाऊक बाजारात लिची आणि चेरी या फळांची खोकी ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काश्मिरी चेरीची आवक

पावसाळा सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील चेरीची आवक थांबेल. त्यानंतर काश्मीरमधील चेरीचा हंगाम सुरू होईल. काश्मीरमधील चेरीची आवक जुलै अखेपर्यंत सुरू असते. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत चेरीची आवक चांगली आहे, असे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

                                     चेरीचे भाव (प्रतिकिलोचे भाव)

* घाऊक बाजार-                         २०० ते २५० रुपये

* किरकोळ बाजार-                     २५० ते ३०० रुपये

 

First Published on May 14, 2019 2:16 am

Web Title: cherry season begins