मी आदर्श पुरुष नाही, जरा ‘ढिला’ आहे. अनेक गोष्टी, भानगडी मीही केल्या आहेत. मात्र, चुकीच्या गोष्टींना कधीही प्रोत्साहन दिले नाही व देतही नाही. सकारात्मक दृष्टिकोन मांडणारे व प्रेरणा देणारे लेखन करतो, ते सर्वाना आवडते. कदाचित हेच माझ्या यशाचे रहस्य असेल, असे मनोगत तरुणाईचा आवडता लेखक चेतन भगत याने सोमवारी िपपरीतील साहित्य संमेलनाच्या मुलाखतीत व्यक्त केले. लेखक होण्याचे स्वप्नातही नव्हते. वास्तविक मला एसटीडी बूथ टाकायचा होता, कारण पैसे मिळवून देणारा व्यवसाय होणार होता. तसेच मुलींना निवांत फोनही करता येणार होते, अशी भावना होती, अशी मनमोकळी कबुलीही त्याने दिली.
पिंपरीतील ८९ व्या मराठी साहित्य संमेलनात प्रा. चेतन जोशी व यशराज पाटील यांनी चेतन भगतची मुलाखत घेतली. यावेळी सभामंडपात तुडुंब गर्दी झाली होती. गर्दीचा ‘सेल्फी’ काढून या संमेलनाची आठवण ठेवण्यास तो विसरला नाही. प्रारंभी चेतनने तरुणाई तसेच उपस्थितांशी थेट संवाद साधला. त्यानंतर, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात त्याने विविध विषयांवर रोखठोक मते व्यक्त केली. चेतन म्हणाला, कोणीही लेखक होऊ शकतो. आवडेल असे लिखाण करणे ही कला आहे, त्यासाठी सतत वाचत राहिले पाहिजे. पुस्तकांमुळे व्यक्तिमत्त्व विकसित होते. कल्पनाशक्तीला वाव मिळतो, एकाग्रता वाढते. आधी खूप शिकावे मग लिहावे. जे काम चांगले जमते, त्यापासून सुरुवात करावी. मेहनतीला पर्याय नाही. झाडाखाली बसून फळ मिळणार नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा व्हावी. मी लेखक होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. एसटीडी बूथ टाकणार होतो. तीन-चार बूथचा मालक झाल्यानंतर खूप व्यवसाय होईल आणि आयुष्य मार्गी लागेल, इतपर्यंत मर्यादित विचार होता. मुलींशी पाहिजे तेव्हा कितीही बोलता येईल, असेही स्वप्नरंजन होते. बँकेची नोकरी सोडून या क्षेत्रात आलो, स्वत:वर विश्वास ठेवला, प्रयत्न केले, संघर्ष केला. वाचकांनी प्रेम केले आणि यशस्वी झालो.

आता महाराष्ट्र हेच माझे घर
मराठीतील वाचनसंस्कृतीचे चेतन भगतने भरभरून कौतुक केले. महाराष्ट्रात लग्नसमारंभातही पुस्तके भेट दिली जातात, याचा त्याने आवर्जून उल्लेख केला. आपली पुस्तके मराठीतही छापून आली आहेत, त्याचा खप हिंदूीपेक्षा जास्त आहे, याकडे त्याने लक्ष वेधले. आता मला नोकरी नाही की कार्यालय नाही. जगात कुठेही राहू शकतो. मात्र, आपण महाराष्ट्र हेच घर बनवले असून मुंबईकर झालो आहोत, या शब्दात त्याने महाराष्ट्राविषयी आत्मियता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठीचा बोलबाला असल्याचे सांगत दिल्लीत महाराष्ट्रीय पध्दतीने लग्न करण्याविषयी अनेकजण उत्सुक असल्याची माहितीही त्याने दिली.

‘पुरस्कार परत देणे ही फॅशन झाली’
आजकाल पुरस्कार परत देणे ही फॅशन झाली आहे. एखाद्याला पुरस्कार मिळाला त्याला महत्त्व नाही. मात्र, तो परत करणारा चर्चेत राहतो. आम्हाला काहीजण विचारतात, तुम्ही पुरस्कार परत केले का? वाचकांचे प्रेम म्हणून पुरस्कार मिळणार असल्यास तो परत करणार नाही, असे चेतनने स्पष्ट केले.