18 September 2020

News Flash

‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ लवकरच शब्दबद्ध

‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ हाच या लेखनाचा केंद्रबिंदू असून इंग्रजीतील हा ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.

 

|| विद्याधर कुलकर्णी

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे प्रकाशन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची राजनीती या काहीशा दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकणारे युवा इतिहास संशोधक डॉ. केदार फाळके यांच्याद्वारे शब्दबद्ध होत आहे. या ग्रंथाचे प्रकाशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे पुणेकरांना होणार आहे.

‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ हाच या लेखनाचा केंद्रबिंदू असून इंग्रजीतील हा ग्रंथ लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. त्यासाठी भांडारकर संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या इन्फोसिस अध्यासनाने डॉ. केदार फाळके यांना दोन महिन्यांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्यासाठी फाळके संस्थेमध्ये रूजू झाले असून या ग्रंथाची सिद्धता झाल्यावर त्याचे प्रकाशन भांडारकर संस्थेतर्फे केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या इन्फोसिस शैक्षणिक समितीचे संचालक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या चरित्रांचे लेखन हे त्यांच्या जीवनातील राजकीय घटना डोळ्यासमोर ठेवून झालेले आहे. मात्र, त्यांच्या राजनीतीविषयक पैलूंवर अद्याप पुरेसा प्रकाश पडलेला नाही. ही बाब ध्यानात घेऊन भरपूर साधनसामग्री उजेडात आल्यानंतर या विषयावर लेखन करण्याचे ठरविले असल्याचे डॉ. केदार फाळके यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील राज्याची ध्येयधोरणे, राज्य मजबूत आणि शत्रूंच्या कारवायांपासून सुरक्षित रहावे या पैलूंवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. त्यांच्या राजवटीतील प्रशासन, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, लष्करव्यवस्था व महसूल मिळवून देणाऱ्या साधनांकडे लक्ष देणे या गोष्टींकडे प्राधान्य दिले आहे. संभाजी महाराज यांच्या पत्रांतून त्यांचे धर्म आणि देवस्थानविषयक दृष्टिकोन उलगडतात. छत्रपती संभाजी महाराज यांनी रामसिंहाला त्यांनी लिहिलेल्या संस्कृतमधील पत्रातून त्यांची दिल्ली जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते. या ग्रंथाच्या नऊ प्रकरणांचे लेखन पूर्णत्वाकडे गेले आहे, असे फाळके यांनी सांगितले.

ग्रंथामध्ये काय..

  •  छत्रपती संभाजी महाराज यांची अस्सल पाच छायाचित्रे
  •  त्यापैकी एक ब्रिटिश लायब्ररी येथील असून दुसरे हॉलंडमधील अ‍ॅमस्टरडॅम येथील रिक्स संग्रहालयातील आहे.
  •  औरंगाबाद येथील संग्रहालयातील छत्रपती संभाजी महाराजांची दोन छायाचित्रे नगर येथील संग्रहालयातील छत्रपती संभाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांचे छायाचित्र
  •  छत्रपती संभाजी महाराजांच्या अस्सल मोडी पत्राचे छायाचित्र
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युपत्राचे छायाचित्र
  • हडकोळण (डिचोली, गोवा) येथील शिलालेखाचे छायाचित्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:33 am

Web Title: chhatrapati sambhaji maharaj publication by bhandarkar research institute akp 94
Next Stories
1 अमली पदार्थ विक्रेत्यांकडून तीन किलो गांजा जप्त
2 पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवणूक
3 बारामतीत उद्धव ठाकरे म्हणाले, माझं घड्याळाचं दुकान नाही, पण…
Just Now!
X