भाजप-शिवसेनेतील कटुता दूर करण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली कटूता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात सोमवारी (१८ मार्च) दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे. पुण्यासह प. महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदार संघांमधील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. पुणे जिल्ह्य़ातील चारही मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती असा थेट सामना असल्याचे प्राथमिक चित्र आहे. निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांमधील कटुता दूर करण्याची गरज लक्षात घेऊन भाजप-सेनेच्या नेत्यांनी मनोमीलन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ही बैठक होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश मावळ आणि शिरूर लोकसभेत होतो. दोन्हीही मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप केल्याने वातावरण दूषित आहे. शिवसेनेकडे असणाऱ्या दोन्हीही मतदार संघांवर भाजपने दावा केल्याने त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे एकत्रित बैठकीद्वारे कार्यकर्त्यांचे मनोमीलन करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी केला आहे. त्यानुसार सोमवारी ही बैठक होणार आहे.

पवारांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा

लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून रविवारी (१७ मार्च) पिंपरी-चिंचवडला राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने शहर राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरू आहे. मध्यवर्ती ठिकाण आणि प्रशस्त जागेची निवड करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन बुधवारी दिवसभर सुरू होते.