मेट्रो, पीएमपी, पाणीपुरवठा, पालिका अनुदान आदी प्रश्नांबाबत चर्चा होणार
मेट्रो, पीएमपी, उच्च क्षमता वाहतूक मार्ग, महापालिकेला शासनाकडून येणे असलेले अनुदान, पाणीपुरवठा यासह अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (१३ मे) पुण्यात येत आहेत. शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन ते प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील खासदार, सर्व आमदार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पुणे शहराचा मेट्रो प्रकल्प केंद्राच्या मंजुरीसाठी सादर झाला असला तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मेट्रो प्रकल्पाला वित्तीय सहभागासह केंद्राची अंतिम मान्यता मिळणे अपेक्षित असून त्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. राष्ट्रीय नागरी परिवहन धोरण आणि पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेला र्सवकष वाहतूक आराखडा या दोन्हीमध्ये सहा पदरी उच्च क्षमता वाहतूक मार्ग विकसित करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गाची लांबी ३३ किलोमीटर असून रुंदी २४ मीटर आहे. या रस्त्यासाठी ज्या जागा आवश्यक आहेत त्यातील बहुतांश जागा विविध शासकीय विभागांच्या ताब्यात आहेत. या जागा मिळण्यासंबंधीचीही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत होणार आहे. शासनाच्या विविध विभागांकडून पालिकेला अनुदान प्राप्त होते. मात्र नगर विकास , गृहनिर्माण विभाग, समाजकल्याण विभाग, शिक्षण विभाग वगैरे विभागांकडून पालिकेला ३०२ कोटी रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे. शासन स्तरावरून हे अनुदान मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी पालिकेची अपेक्षा असून बैठक कार्यपत्रिकेवर हा विषय घेतला आहे.
राज्य शासन पीएमपीकडून प्रवासी कर आणि बाल संगोपन कर घेते. हा कर प्रवाशांकडून घेतला जातो. मार्च २०१६ अखेर १६३ कोटी इतका प्रवासी कर आणि ६७ कोटी इतका बालसंगोपन कर शासनाकडे भरणे प्रलंबित आहे. या कराबाबत परिवहन आयुक्तांनी पीएमपीला नोटीस दिली आहे. ही रक्कम माफ व्हावी अशी विनंती बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली जाणार आहे. पीएमपीच्या जागांना अडीच चटईक्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) मंजूर झाल्यास पीएमपीला त्याचा लाभ होईल. या संबंधीचा प्रस्ताव महापालिकेकडून अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे गेला आहे. त्याला मंजुरी मिळावी अशी विनंती बैठकीत केली जाईल. या विषयांसह इतरही अनेक विषय कार्यपत्रिकेवर घेण्यात आले आहेत.