कुंभारवाडा परिसरात बालकांसह पालकांची झुंबड; प्लास्टर ऑफ पॅरिसचे किल्ले घेण्यावरच भर

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत बाळगोपाळ दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. मात्र, सध्याच्या सदनिका संस्कृतीमध्ये किल्ले बनविण्यापेक्षाही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तयार किल्ले घेण्यावरच भर दिला जात आहे. या  किल्ल्यांवर ठेवण्यात येणाऱ्या चित्रांच्या खरेदीसाठी कुंभारवाडा परिसरात बालकांसह पालकांचीही झुंबड उडाली आहे.

दिवाळी म्हटलं की बाळगोपाळांची किल्ला बनविण्यासाठी धडपड सुरू होते. पूर्वी वाडय़ामध्ये असलेल्या मोकळ्या अंगणात मुले एकत्र येत किल्ला तयार करायचे. आपला किल्ला सुबक आणि देखणा कसा होईल अशी सर्जनशीलता जपली जायची. मात्र, सध्याच्या सदनिका संस्कृतीमध्ये मुलांना मातीमध्ये खेळण्याचा आनंद लुटू देण्याऐवजी पालक  किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती खरेदी करण्यावर भर देत आहेत. दिवाळी आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने तयार किल्ले आणि त्यावर ठेवण्यात येणाऱ्या चित्रांच्या खरेदीसाठी बालक आणि पालक कुंभारवाडा परिसरात गर्दी करत आहेत.

करोना प्रादुर्भावाचे सावट किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि चित्र खरेदीवर पडले असल्याचे विक्रेते प्रकाश िडबर यांनी सांगितले. ते म्हणाले, की अगदी अडीचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत विविध आकारातील किल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आधी साचा तयार करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती घडविल्या जातात. कुंभारवाडा परिसरातून शहराच्या विविध उपनगरांमध्ये किल्ले विक्रीसाठी पाठविले जातात. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे कुंभारांनी बनविलेले किल्ले वाळलेले नाहीत. त्याचप्रमाणे टाळेबंदीमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागल्याने मुलांचा हट्ट पुरविण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे जाणवते. त्यामुळेही किल्ले खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांबरोबर घासाघीस करत नाही. दोन पैसे कमी मिळाले तरी बालकांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद महत्त्वाचा वाटतो.

चित्रांना मोठी पसंती

किल्ला तयार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी, मावळे, गवळण, तोफा, शस्त्रधारी शिपाई, वाघ, सिंह, गाय अशा विविध ३०-३५ चित्रांच्या प्रतिकृती ठेवून किल्ल्याची सजावट केली जाते. किल्ल्यांवर ठेवण्यात येणाऱ्या या चित्रांच्या खरेदीसाठी बालचमूंसह पालक कुंभारवाडा परिसरात गर्दी करत आहेत, असे चित्रांची विक्री करणारे सोमनाथ वाघोलीकर यांनी सांगितले. करोना संकटामुळे या वर्षी चित्रांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. शंभर रुपये ते तीनशे रुपये डझन या दरामध्ये चित्रे विक्रीस ठेवण्यात आली आहेत, असे वाघोलीकर यांनी सांगितले.