29 February 2020

News Flash

लहान मुलांना विषाणूसंसर्ग आणि उलटय़ा-जुलाबांचा त्रास!

थंडी फारशी सुरू झालेली नसली, तरी लहान बाळांमध्ये हिवाळ्यातल्या उलटय़ा-जुलाबांचे (विंटर डायरिया) रुग्ण बघायला मिळू लागले आहेत

थंडी फारशी सुरू झालेली नसली, तरी लहान बाळांमध्ये हिवाळ्यातल्या उलटय़ा-जुलाबांचे (विंटर डायरिया) रुग्ण बघायला मिळू लागले आहेत. तसेच हवामानातील चढउतारांच्या पाश्र्वभूमीवर पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये साधा विषाणूजन्य तापही मोठय़ा प्रमाणावर दिसतो आहे.
६ महिने ते दीड वर्षे या वयोगटातील बाळांमध्ये ‘विंटर डायरिया’ (रोटाव्हायरस डायरिया) बघायला मिळत असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ललवाणी यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘हिवाळ्यात दिसणाऱ्या ‘विंटर डायरिया’चे रुग्ण आता बघायला मिळत आहेत. हा आजार साधारणत: २ वर्षांच्या आतल्या बाळांमध्ये दिसतो. पहिल्या दिवशी बाळाला उलटय़ा होतात व त्यानंतर पाण्यासारखे पातळ जुलाब लागतात आणि शरीरातील पाणी कमी होते. अशा आजारात बाळाला ‘ओरल रीहायड्रेशन सोल्युशन’ आणि झिंक देण्यास डॉक्टरांकडून सुचवले जाते. या उलटय़ा जुलाबांवर प्रतिजैविके लागत नाहीत.’
साध्या विषाणूजन्य तापही १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसत असल्याचे डॉ. ललवाणी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘बाह्य़रुग्ण विभागातील ७० ते ८० टक्के बालरुग्ण ताप, कफ ,सर्दी, पुरळ अशा लक्षणांचे असतात. हे पुरळ गोवरासारखे दिसले तरी तो गोवर नसल्याचे लक्षात येते व ते ३ ते ४ दिवस टिकू शकते. तापाची डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच खात्री करून घेणे आवश्यक आहेच, पण स्वत:च्या मनाने मुलांना प्रतिजैविके न देणेही गरजेचे आहे. साध्या विषाणूजन्य तापाला लक्षणांनुसार उपचार द्यायची गरज असते व हा आजार ३-४ दिवसांत बराही होऊ शकतो.’
डिसेंबरमध्ये चिकुनगुनियाचे २० रुग्ण!
या वर्षी चिकुनगुनिया काही प्रमाणात दृष्टीस पडत असल्याचे फिजिशियन डॉ. सचिन यादव यांनी सांगितले. पालिकेच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये आतापर्यंत चिकुनगुनियाचे २० रुग्ण सापडले आहेत, तर नोव्हेंबरमध्ये शहरात चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या १६ होती. डॉ. यादव म्हणाले, ‘ताप, अंगावर पुरळ, सांधेदुखी, सांध्यांना सूज अशी प्रमुख लक्षणे यात दिसतात. डेंग्यूत रुग्णाचे पूर्ण अंग व हाडे दुखतात, तर चिकुनगुनियात संधिवाताप्रमाणे सांधे दुखतात व सुजतात. गेल्या २ ते ३ महिन्यांत मी १० ते १५ चिकुनगुनियाचे रुग्ण पाहिले आहेत.’
स्वाइन फ्लू आणि डेंग्यूत घट!
सध्या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव राज्यात कमी झाला असून जानेवारीनंतर स्वाइन फ्लूची लहान साथ येऊ शकेल, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. पुण्यात ऑक्टोबरपासून स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. ऑक्टोबरमध्ये पुण्यात स्वाइन फ्लूचे ६३ रुग्ण सापडले होते. नोव्हेंबरमध्ये ही संख्या १० झाली, तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे २ रुग्ण सापडले आहेत. डॉ. आवटे म्हणाले, ‘नोव्हेंबरपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंमध्ये घट होताना दिसत आहे. चालू महिन्यात दहा दिवसांत राज्यात स्वाइन फ्लूचे ६ रुग्ण सापडले असून दोन जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये ६ जानेवारीपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी व फेब्रुवारीत राज्यात स्वाइन फ्लूची लहान साथ येण्याची शक्यता आहे, परंतु आपल्याकडे दिसणारी थंडीतली स्वाइन फ्लूची साथ ही पावसाळ्यानंतरच्या साथीपेक्षा कमी असते.’
डेंग्यूतली घट स्वाइन फ्लूएवढी नसली, तरी डेंग्यू घटल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये शहरात २०० डेंग्यूसदृश रुग्ण सापडले, तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत ८५ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले आहेत. डेंग्यूसदृश रुग्णांची हीच संख्या शहरात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६० होती.

First Published on December 15, 2015 3:21 am

Web Title: children infected virus doctor health
टॅग Children,Doctor,Virus
Next Stories
1 शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार
2 निमित्त ‘साहेबांच्या’ वाढदिवसाचे, तयारी पालिका निवडणुकीची
3 ‘स्मार्ट सिटी’ला विरोधावरून मनसेचे घुमजाव, पुण्यातील प्रस्तावाला पाठिंबा
X
Just Now!
X