आपल्या परिसरातील, आजूबाजूच्या वस्त्यांमधील उनाडक्या करणाऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी एका महाविद्यालयीन तरुणाने काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले आणि त्यातून अनेक मुलांना आधार देणारा त्यांच्या हक्काचा असा ‘बाल शिक्षण मंच’ स्थापन झाला. या उपक्रमात सुरुवातीला एकांडा शिलेदार असलेल्या अमर पोळ यांना त्यांच्याच संस्थेतून पुढे गेलेल्या मुलांची साथ मिळाली. मुलांना शिकण्यासाठी मदत करण्याबरोबरच त्यांचा सर्वागीण विकास करण्यासाठी आणि व्यसनाधिनता कमी करण्यासाठी संस्था काम करत आहे.

लहान घर, कौटुंबिक अडचणी, पालकांचे शिक्षण नाही अशा परिस्थितीत असलेल्या मुलांना अभ्यासाचे वातावरण मिळावे म्हणून एक हाडाचा शिक्षक गेली दहा वर्षे काम करत आहे. कोंढवा येथील महानगरपालिकेच्या शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून काम करणारे अमर पोळ हे वस्तीतील मुलांसाठी अभ्यासिका चालवत आहेत. ‘शाळेतून घरी आले की दप्तर टाकायचे आणि उनाडक्या करायला बाहेर पडायचे,’ शाळेत शिकवलेले कळत नाही म्हणून कसाबसा शाळेतील वेळ ढकलायचा, तंबाखू, गुटखा, विडी अशी व्यसने करायची हा आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये दिसणारा शिरस्ता पोळ यांनी मोडीत काढला. त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ‘बाल शिक्षण मंच’ या संस्थेची अभ्यासिका गुलटेकडी परिसरातील वस्तीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हक्काचे ठिकाण झाले आहे. रोज सायंकाळी शाळा सुटली की साडेसहा ते रात्री साडेनऊपर्यंत मुले अभ्यासिकेत येतात. इथेच गृहपाठ होतो, शंकांचे निरसन होते, परीक्षेचीही तयारी होते. अमर पोळ आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांच्या शंका सोडवतात. एखादे मूल मागे पडते आहे असे वाटले तर त्या विषयाची तयारी करून घेतात. शाळेला सुट्टी असली तरी अभ्यासिका मात्र वर्षभर सुरू असते. अभ्यासाबरोबरच खेळ आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवले जातात. या उपक्रमांच्या नियोजनापासून तो पूर्णत्वाला नेण्यापर्यंत सगळी जबाबदारी मुलेच पार पाडतात. शालेय शिक्षण झाले की, पुढील शिक्षणासाठी मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन संस्थेकडून केले जाते आणि त्यातून या मुलांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळते.

‘प्रज्वलित दीपोत्सव’

प्रज्वलित दीपोत्सव हा उपक्रम ‘बाल शिक्षण मंचकडून गेली दहा वर्षे चालवला जातो. अभ्यासिकेतील मुलांनी दुसऱ्या वस्तीतील मुलांबरोबर दिवाळी साजरी करायची अशी त्यामागची संकल्पना आहे. या वर्षी कोथरूड भागातील केळेवाडी वस्तीतील मुलांबरोबर अभ्यासिकेतील मुलांनी दिवाळी साजरी केली. ही दिवाळी देखील फराळ आणि कपडे एवढय़ापुरतीच मर्यादित नसते. मुलांना नव्या कलांची, खेळांची ओळख व्हावी असा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो. या वर्षीही नृत्य, सांघिक खेळ, जादूचे प्रयोग, आकाश कंदील तयार करणे, पणत्या रंगवणे, किल्ले तयार करणे अशा उपक्रमांनी दिवाळी साजरी झाली. या कार्यक्रमाचे नियोजन नीरज यादव, मल्लेश शिवशरण, गोपी पाटील, विजय गायकवाड, सचिन मुळे, मयूर कांबळे, नेहा इरेश, प्रथमेश, कुमरेश या मुलांनी केले होते.

‘मी या वस्तीतच मोठा झालो. महाविद्यालयात शिकत असताना शिक्षण सोडून मुले उनाडक्या करताना दिसायची. कोणत्याही परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण झालेच पाहिजे असे वाटायचे. मुलांना अभ्यास आवडत नाही, शाळा आवडत नाही त्याची कारणे लक्षात आल्यानंतर पालकांशी बोलून संध्याकाळी मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. त्यातून २००६ मध्ये या मुलांची अभ्यासिका सुरू झाली. मनपाच्या शाळांमध्ये सध्या ही अभ्यासिका चालते. अभ्यासिकेतील मोठय़ा विद्यार्थ्यांनाच एकत्र करून २००९ मध्ये संस्थेची नोंदणी करण्यात आली. आता अभ्यासिकेतील काही मुलांनी एमएसडब्ल्यू केले आहे. काहीजण विज्ञान, वाणिज्य विषयांतील पदव्युत्तर पदवी घेऊन नोकरी करतानाच अभ्यासिकेचीही जबाबदारी उचलत आहेत.’   – अमर पोळ