देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज सगळीकडे लहान मुलं आपल्या कुटुंबासोबत या सणाचा आनंद लुटत असताना दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलांच्या वाट्याला मात्र हे सुख येत नाही. मात्र, या मुलांना सोबत घेऊन दिवाळी अविस्मरणीय करण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील भोई प्रतिष्ठानने राबवला. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यातल्या काही गावातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या १३ मुलांनी पुण्यात उत्साहात दिवाळी साजरी केली.

या मुलांपैकी एका आठ वर्षांच्या अंबिका क्षीरसागर या चिमुकलीने सोमवार पेठेतील अजय शिंदे यांच्या घरी दिवाळी साजरी केली. तिने लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं, “मी इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून मला तीन बहिणी आहेत. आमच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. यामध्ये जे पिकतं त्यातूनच आमच घर चालतं. मी चार वर्षांची असताना वडिलांनी आत्महत्या केली. तेव्हापासून आईने शेती करून, आमचा सांभाळ केला. आई खूप कष्ट करून, आम्हाला वाढवत आहे. आमची घरची बिकट परिस्थिती असताना भोई प्रतिष्ठानमुळे आम्हा चारही बहिणींना शिक्षण घेणे शक्य झाले. मी देखील शिकून मोठेपणी डॉक्टर होणार आहे.”

“अंबिका गेल्यावर्षी पहिल्यांदा आमच्या घरी आली तेव्हा ती आमच्या कुटुंबात मिसळेल का, ती इथे राहिल का याचे आमच्या मनावर दडपण होतं. पण तसं काही घडलं नाही, उलट आमच्या घरातील एका सदस्याप्रमाणे ती आमचीच होऊन गेली. मोठ्या उत्साहात तिने गेल्यावर्षी आमच्यासोबत दिवाळीचा सण साजरा केला होता. यावेळी पुन्हा ती आमच्या घरी आली, त्यामुळे आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही ज्या प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाने पुढे येऊन या मुलांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहनही अजय शिंदे यांनी केले आहे.

भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई म्हणाले, “एखाद्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने या घटनेचा परिणाम त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. अशा घटनेमुळे कुटुंबातील लहान मुलांचे तर आयुष्यच बदलून जाते. यामुळे मुलं शिक्षणापासून दूर जातात. हे लक्षात घेऊन, आम्ही नांदेड इथल्या १३ मुलांना गेल्यावर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी पुण्यात आणले होते. यंदा देखील आम्ही हा उपक्रम राबवला असून या चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहण्यास मिळत आहे. त्यांचा हा आनंद पाहून आम्हा सर्वांनाही समाधान मिळाले. समाजातील प्रत्येक घटकाने, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांसाठी पुढे येऊन काम करायला हवे.”