|| विद्याधर कुलकर्णी

जतनीकरणाअभावी बालप्रेक्षक आनंदापासून वंचित

पुणे : करोना प्रादुर्भावामुळे बालनाट्यांची टाळेबंदी झाली असून बालनाट्यांच्या जतनीकरणाअभावी पडद्यावर किंवा मोबाइलमध्ये बालनाट्य अनुभवण्याच्या आनंदापासून बालप्रेक्षक वंचित राहिले आहेत. नाट्यसंस्थांकडे काही नाटकांचे चित्रीकरण असले तरी ते तांत्रिकदृष्ट्या उत्तम नसल्याने ही नाटके ऑनलाइन माध्यमातून दाखविण्यासाठी मर्यादा येत आहेत.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्चअखेरीस टाळेबंदी लागू करण्यात आली होती. जवळपास तीन महिने नाट्यगृहे बंद असल्याने मुलांसाठी बालनाट्यांचे प्रयोग होऊ शकले नव्हते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बालनाट्यांचे प्रयोग पाहण्यापासून बाळगोपाळ दूरच राहिले. तर करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही बालचमूंना बालनाट्यांचा आनंद घेता येत नाही. ही परिस्थिती एकीकडे असली तरी चित्रीकरण करून बालनाट्यांचे जतनीकरण करण्याचे प्रयत्न फारसे झालेले नसल्याने घरबसल्या बालनाट्यांचा आनंद घेण्यापासून बालप्रेक्षक वंचित राहिले आहेत. रंगभूमीला नवे कलाकार देणारी बालरंगभूमी चळवळ सध्या तरी ऑनलाइन नाट्यप्रशिक्षणाचा अपवाद वगळता पूर्णपणे थांबली असल्याचे चित्र दिसत आहे.

नाट्यसंस्कार कला अकादमीचे विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, नाटकाचा आनंद रंगभूमीवर प्रत्यक्ष पाहण्यामध्ये आहे. बालनाट्य या विषयाकडे दुर्लक्ष झालेले दिसते हे वास्तव नाकारता येत नाही. आमच्या संस्थेची ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’, ‘आजोबांच्या धम्माल गोष्टी’, ‘आई शप्पथ’, गदिमा यांच्या बालपणातील चरित्रावर आधारित ‘नाच रे मोरा’ ही बालनाट्ये आणि ‘भित्रा राजपुत्र’ व ‘बिनकपड्याचा राजा’ या बालनाटिका डीव्हीडी स्वरूपात चित्रीकरण केलेल्या आहेत. पण, ती पाहताना मजा येत नाही. मुलांसाठी आम्ही या डीव्हीडी दाखविण्याचा प्रयत्न करू.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले म्हणाल्या, करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रीप्स नाट्यमहोत्सव होऊ शकला नाही. ऑनलाइन व्यासपीठावर दाखविता येतील इतके बालनाट्यांचे चित्रीकरण तांत्रिकदृष्ट्या उत्तम नाही. आम्ही जतनीकरण करण्यासाठी दहा-बारा नाटकांचे चित्रीकरण केले आहे. नाटक नाट्यगृहामध्ये पाहण्याची मजा येते ती पडद्यावर पाहताना येत नाही. सध्या तरी ही नाटके दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. यंदा नवीन नाटक बसविण्याचे काम सुरू केले होते. पण, टाळेबंदीमुळे ते ठप्प झाले. ‘डू अँड मी’, ‘आईपण, बाबा पण…’, ‘प्रोजेक्ट अदिती’, ‘एकदा काय झालं’,  ‘तू दोस्त माह्या’ या नाटकांचे चित्रीकरण केले आहे. नाटकातील प्रकाशयोजनेचा परिणाम पडद्यावर पाहताना येत नाही. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांच्याशी बोलून बालनाट्ये दाखविण्याचा विचार मनात आहे.

समस्या काय आहेत?

करोना प्रादुर्भावामुळे नाट्यगृहे बंद असल्याने बालनाट्याचे प्रयोग थांबले.

ऑनलाइन प्रशिक्षण वगळता नाट्यसंस्थांच्या नाट्यविषयक उपक्रमांना खिळ बसली आहे.

बालनाट्यांचे चित्रीकरण तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाचे नसल्याने ते ऑनलाइन माध्यमाद्वारे दाखविणे अवघड आहे.

अशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कोणालाच नसल्याने जतनीकरणापेक्षा संस्थांनी बालनाट्यांचे प्रयोग करण्यावरच लक्ष केंद्रीत केले.

नाट्यप्रयोग होऊ शकली नसले तरी नाट्यसंस्कार कला अकादमीने सहा ऑनलाइन शिबिरांद्वारे नाट्यप्रशिक्षण घेतले. आतापर्यंत माझी शिबिरे पुण्यामध्येच होती. आता ऑनलाइन शिबिरांमध्ये भारतभरातून मुले सहभागी झाली. हा फायदा नक्की झाला. – प्रकाश पारखी, प्रमुख विश्वस्त, नाट्यसंस्कार कला अकादमी