महापालिका अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा निषेध करून महिला व बाल कल्याण समितीची बैठक बुधवारी तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आली. यापुढील बैठकीला अधिकारी न आल्यास समितीच्या सर्व सदस्या राजीनामे देतील, असा इशाराही समितीने दिला असून तशी स्पष्ट कल्पना महापौर व आयुक्तांना बुधवारी देण्यात आली.
समितीच्या अध्यक्षा वैशाली मराठे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. समितीच्या सदस्या प्रतिभा ढमाले, संगीता ठोसर, मनीषा चोरबेले, सुनंदा गडाळे याही या वेळी उपस्थित होत्या. महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्याचे अधिकाऱ्यांनी बंद केले असून याच कारणाने गेल्या दोन बैठका तहकूब करण्यात आल्या होत्या. निदान तिसऱ्या बैठकीला तरी अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. मात्र, सर्व प्रमुख आजही अनुपस्थित होते, असे मराठे यांनी सांगितले.
अधिकारी नसल्यामुळे बैठक तहकूब करून समितीच्या सर्व सदस्या महापौरांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या. त्या वेळी पक्षनेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीतच सर्व जणींनी थेट प्रवेश करत महापौर व आयुक्तांकडे अधिकाऱ्यांबद्दल तक्रार केली. पुढील बैठकीला सर्व प्रमुख संबंधित अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, तर सर्व सदस्या राजीनामे देतील, असाही इशारा या वेळी देण्यात आला.