चीनच्या हालचालींमुळे आपल्यासमोर मोठे संकट निर्माण झाले असून या राष्ट्रीय समस्येकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बोलताना म्हटले. ‘चीनच्या हालचालींबद्दल सरकारने भूमिका घ्यायला हवी आणि त्या भूमिकेला सर्वांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन पाठिंबा द्यायला हवा,’ असेदेखील त्यांनी पुढे बोलताना म्हटले.

शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीस ५० वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांचा सत्कार ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरिश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सचिव शशिकांत सुतार आदी यावेळी उपस्थित होते. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘२५ वर्षांपूर्वीदेखील सीमेवर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मी चीनला गेलो होतो. तेव्हा चीनच्या पंतप्रधानांशी समुद्र किनाऱ्यावर तब्बल २ तास चर्चा केली. त्यावेळी बोलताना चीनच्या पंतप्रधानांनी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. जगाचे आर्थिक केंद्र होण्यासाठी २५ वर्षे कष्ट करणार असल्याचे त्यावेळी त्यांनी म्हटले होते आणि त्यानंतर चीन खरोखरच महासत्ता बनला.’

या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनीदेखील देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. ‘सध्या देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली असून देश वेगळ्या वळणावर आला आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. देशातील सद्यस्थिती पाहता विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यांचे नेतृत्त्व फक्त शरद पवार हेच उत्तम पद्धतीने करु शकतील,’ असे वैद्य यांनी म्हटले.

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांनादेखील सल्ला दिला. कुटुंबातील एकाच व्यक्तीने शेती करावी, असे त्यांनी म्हटले. ‘जगात आपला देश अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही चिंतेची बाब असून पूर्वी जी कुटुंबं शेती करत होती, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली असून त्यासाठीची शेत जमीन अपुरी पडत आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात निसर्गाचा फटकादेखील अनेकदा शेतकयांना बसतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करतो,’ असे शरद पवार म्हणाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबातील एकानेच शेती करावी आणि इतरांनी व्यवसाय करावे, असा सल्ला त्यांनी दिला.