चिंचवड रेल्वे स्थानकावरील तीन तिकीट खिडक्या सुरू करण्याच्या प्रवासी संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत असल्याची तक्रार संघाने केली आहे. नियोजनाच्या अभावामुळे स्थानकावर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र नियमित दिसू लागले आहे.
प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात येथील परिस्थिती नमूद केली आहे. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सिंहगड एक्सप्रेस थांबते. तर, सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पुणे-लोणावळा लोकल व सहा वाजून दहा मिनिटांनी लोणावळा-पुणे लोकल थांबते. स्थानकावर दोन आणि चिंचवडगावातील प्रवाशांसाठी एक अशा तीन खिडक्या होत्या. मात्र, तिसरी खिडकी सकाळी आठ वाजता उघडली जाते. उर्वरित दोनपैकी एक खिडकीच खुली ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांच्या लांब रांगा लागतात. अनेकांना तिकीट काढता येत नाही, गाडय़ा चुकतात, ज्येष्ठांची धावपळ उडते. या सर्व गोष्टींकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. येथील थांब्याचा अवधी वाढवावा, अशी मागणी भालदार यांनी केली आहे.