कारवाईच्या भीतीने विक्रेत्यांकडून विक्री बंद; शहरातील नागरिक आणि पक्षी जखमी झाल्याचा परिणाम

शिवाजी पुलावर दुचाकीस्वार महिलेचा गळा मांजामुळे कापल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर  चिनी मांजा घातक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. यापूर्वी शहरात नागरिक तसेच पक्षी या मांजामुळे जखमी झाल्याच्या घटना  घडल्या होत्या. पण मांजामुळे एका महिलेचा बळी गेल्यानंतर पतंग विक्रेत्यांनी तातडीने मांजा विक्री तूर्त तरी बंद केली आहे. दुकानाच्या बाहेर आसारीला लटकणारा मांजा गायब केला आहे.

शिवाजी पुलावरून निघालेल्या दुचाकीस्वार सुवर्णा मुजुमदार (वय ४५, रा. सिंहगड रस्ता) यांचा बुधवारी (७ फेब्रुवारी) मांजामुळे गळा कापला गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले होते. उपचारादरम्यान, सुवर्णा यांचा खासगी रुग्णालयात रविवारी (११ फेब्रुवारी) मृत्यू झाला. यापूर्वी शहरात दांडेकर पूल परिसर, दापोडी भागात मांजामुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मांजामुळे पक्षी जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. मांजामुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने शहरातील पतंग विक्रेते धास्तावले आहेत. शहरातील बोहरी आळी परिसरात पतंग विक्रेत्यांची दुकाने आहेत. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने मंगळवारी बोहरी आळी परिसरातील पतंग विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणी केली तेव्हा कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या पतंग विक्रेत्यांनी दुकानाबाहेर  मांजा लावलेल्या आसारी काढून घेतल्या आहेत. पतंग मिळेल  पण मांजा मिळणार नाही, असे पतंग विक्रेत्यांनी सांगितले.

पिंपरीतही मांजामुळे दुखापती

पिंपरी चिंचवड परिसरात तीन वर्षांचा मुलगा हमजा खान याला मांजामुळे गंभीर स्वरुपाची इजा झाल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. त्याच्या डोळ्यांच्या खालील त्वचा कापली गेली होती. त्यानंतर काळेवाडी भागात दुचाकीस्वार रंगनाथ भुजबळ (वय ६२, रा. काळेवाडी) यांचा गळा मांजामुळे कापला गेला होता. केशवनगर आणि कासारवाडी भागात मांजामुळे पक्ष्यांना इजा झाली होती.

नदीपात्रात पतंगबाजी करणाऱ्यांवर कारवाई

नदीपात्र तसेच शहरातील विविध पुलांवर पतंग उडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पतंग उडवणारी मुले बारा ते चौदा वयोगटांतील आहेत. पोलिसांकडून पतंग उडवणाऱ्या मुलांना ताब्यात घेण्यात येते. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात येत आहे. समजा, एखाद्याकडे चिनी मांजा आढळल्यास त्याच्यावर खटला दाखल करण्यात येतो. मुलांनी  चिनी मांजा कुठून आणला आहे, याचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

मांजा मिळेल पण ऑनलाइन

बोहरी आळी भागातील एका पतंग विक्री दुकानात मांजाबाबत  विचारणा केली असता मांजा विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मांजा मिळेल पण तो ऑनलाइन मागवावा लागतो. मोनोकाइट नावाच्या एका संकेतस्थळावरून मांजा मागवावा लागतो, असे सांगण्यात आले.

कारवाईसाठी गुन्हे शाखेची पथके

राष्ट्रीय हरित लवादाकडून  चिनी नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सात पथके तयार केली आहेत. शहराच्या वेगवेगळय़ा भागांत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शहरात किती मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. याची माहिती संकलित करण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.