अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘वा.ग. चिरमुले पुरस्कार’ प्रख्यात माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. नारायण मूर्ती यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  
बँकिंग, इन्श्युरन्स, अर्थशास्त्र, उद्योग, तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस चिरमुले पुरस्कार दिला जातो. ट्रस्टचे विश्वस्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अरुण गोडबोले, श्रीकांत जोशी, पी.एन. जोशी यांनी एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. नारायण मूर्ती यांची निवड केली. ट्रस्टतर्फे १९९४ पासून हा पुरस्कार दिला जातो. २९ मार्च रोजी नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या प्रसंगी डॉ. मूर्ती यांचे ‘कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.