सर्कस म्हणजे प्राण्यांचे खेळ, साहसी कसरती, हरहुन्नरी विदूषक अन् बरेच काही.. पण या साऱ्यांवर नियंत्रण असते ते ‘रिंगमास्टर’चे. असाच मूळचा कोलंबियाचा असलेला जगप्रसिद्ध रिंगमास्टर झियान कालरेस रॅम्बो सर्कससोबत पुण्यात आला आहे आणि तो पुण्यात स्थायिक होण्यासाठी म्हणून घर शोधत आहे.. आयुष्यात अनेक चढउतार अनुभवलेल्या कालरेसची आता पुणेकर होण्याची इच्छा आहे.
सर्कस हेच कालरेस याचे जीवन आहे. तो सध्या रॅम्बो सरकसमध्ये रिंग मास्टर आहे. तो मूळचा कोंलबियाचा. त्याच्या चार पिढय़ा या सर्कशीत गेल्या. त्यामुळे जन्मल्यापासून त्याचा सर्कसशी संबंध. वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच तो सर्कशीत खेळ सादर करू लागला. त्याचबरोबर लाइट, साउंड इंजिनियर म्हणूनही काम करतो. तसेच, सर्कशीतले सर्व व्यवस्थापनही पार पाडतो.. गरज पडेल ती जबाबदारीसुद्धा उचलतो. कालरेच्या खेळाचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्कशीतल्या ‘मृत्युचक्रा’चा खेळ. तो वेगाने फिरणाऱ्या रिंगवरचा हा चित्तथरारक खेळ सादर करतो. ५५ फूट उंचीवर फिरणाऱ्या या पेंडुलमवर अगदी सहज उडी मारून चढतो आणि जोरात फिरणाऱ्या गोल पेंडुलमवर उभे राहत विविध खेळ सादर करतो.
सिंह, घोडे, कुत्रे, हत्ती अशा सर्व प्राण्यांना कालरेस उत्तम प्रशिक्षण देतो. सर्कशीतल्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचे स्वत:चे लक्ष असते. त्याची भाषा स्पॅनिश असल्याने त्याला बोलण्यासाठी अडचण यायची. आता त्याने हिंदी भाषा शिकून घेतली. कलाकारांनाही तो सतत नव-नवीन माहिती आणि प्रशिक्षण देत असतो. त्याप्रमाणेच प्राण्यांना परदेशातील नावीन्यपूर्ण खेळ शिकवत आहे. अशा या हरहुन्नरी कालरेसला लग्न करून पुण्यात राहण्याची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्याने प्रयत्नही सुरू केले आहेत. पुण्यात घर घेण्यासाठी तो फिरतो आहे. कारण त्याला भारतीय संस्कृतीने भारावून टाकले आहे.

‘‘सिंगापूर, मलेशिया, कोलंबिया, अरब असे अनेक देश पाहिले आहेत. मात्र, भारतीय संस्कृतीने भारवून टाकले आहे. भारतात पैसा कमी असेल, पण प्रेम खूप आहे. भारतात लग्न टिकतात, एकत्र परिवार सुखात राहतो, मुलं आई-वडिलांवर प्रेम करतात. म्हणून मला लग्न करून भारतात स्थायिक व्हायचंय.. त्यातही प्राधान्य असेल ते पुण्यालाच!’’
– झियान कालरेस, रिंगमास्टर
 —
सर्कशीची तंबू.. असाही!
पुण्यात आलेल्या रॅम्बो सर्कशीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे- या सर्कशीचा तंबू. तो अत्याधुनिक आहे अन् आगरोधकसुद्धा! असा तंबू पुण्यात पहिल्यांदाच उभारण्यात आला आहे.
यापूर्वी सर्कशीमध्ये खाकी कपडय़ांमध्ये टेन्ट उभारले जात असत. त्यामुळे आगीचा, अवेळी येणाऱ्या वाऱ्यांचा, पावसाचा धोका असायचा. मात्र, आता पुण्यात अत्याधुनिक असा वातानुकूलित (ए.सी.) तंबू उभारण्यात आला आहे. त्यामुळे दिवसाही रात्रीसारखा अंधार करता येतो. इतर कपडय़ाचा तंबू जास्तीत जास्त ३ वर्ष चालू शकतो. मात्र, 3Tambooआधुनिक तंबू किमान १५ वर्ष टिकतो.
टेन्ट बनवण्यासाठी खास यूएस सैनिकांसाठी वापरण्यात येणारे कापड वापरण्यात आला आहे. ‘यूव्ही रेडियन्ट’ आणि ‘ब्लॉक आउट’ या कपडय़ांचा वापर करण्यात आला आहे. तसेच भारतीय कपडाही यात मिसळण्यात आला आहे. ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी मशिन’ने हा कपडा जोडण्यात आला आहे. त्यामुळे रॅम्बो सर्कशीमध्ये आग, जोऱ्याचा वारा, आणि मुसळधार पावसापासून संरक्षण होते. हा तंबू पुण्यात तयार करण्यात आला असून यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यात ४५० टन ए.सी. बसवण्यात आला आहे.