News Flash

शनिवारची मुलाखत : देखण्या वास्तू आणि नागरिकांची शाबासकी…

या वास्तू बघितल्यानंतर या वास्तू किंवा ही नाटय़गृह महापालिकेची वाटत नाहीत, ती खासगी मालकीची वाटतात,

शनिवारची मुलाखत : देखण्या वास्तू आणि नागरिकांची शाबासकी…
श्याम ढवळे

भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे नाटय़गृह, वानवडीचे महात्मा फुले नाटय़गृह, बाळासाहेब ठाकरे कलादालन.. महापालिकेने गेल्या काही वर्षांत अशा अनेक उत्तमोत्तम वास्तू, नाटय़गृह आणि कलादालनांची उभारणी केली आहे. या वास्तू बघितल्यानंतर या वास्तू किंवा ही नाटय़गृह महापालिकेची वाटत नाहीत, ती खासगी मालकीची वाटतात, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त होते. ही प्रतिक्रिया म्हणजे महापालिकेला मिळालेली शाबासकीच म्हटली पाहिजे. ही शाबासकी ज्या अधिकाऱ्यामुळे मिळते त्यांचे नाव श्याम ढवळे. महापालिकेच्या वारसा विभागाचे (हेरिटेज सेल) ते प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता असलेल्या ढवळे यांनी अनेक देखण्या वास्तुनिर्मितींची कथा ‘लोकसत्ता’ला सांगितली..

महापालिकेच्या वास्तू सरकारी चाकोरीबाहेर कशा नेल्या गेल्या?
ही गोष्ट खरी आहे की महापालिकेची कोणतीही वास्तू म्हटली की ती एका विशिष्ट पद्धतीने उभारली जात असे. त्यात सौंदर्यदृष्टीचा फारसा विचार नव्हता. त्यांचे रंग-रूप याकडेही फारसे बघितले जायचे नाही. महापालिकाच कशाला अगदी खासगी व्यावसायिकदेखील घरे, इमारती ज्या पद्धतीने उभ्या करत होते त्यातही एकसारखेपणाच होता. मात्र शहराची जशी वाढ होत गेली, विस्तार होत गेला, प्रगती होत गेली तसे सौंदर्यदृष्टी, कलात्मकता यांनाही महत्त्व आले. तेच भान महापालिकेत काम करतानाही आम्ही ठेवले. त्यातून उत्तमोत्तम, देखण्या वास्तू उभ्या राहिल्या.
हे घडवून आणण्यासाठी कार्यपद्धतीत काही बदल केले का?
मुख्य म्हणजे आम्ही हा विचार केला की खर्च आणि श्रम तर महापालिकाही करते. मग त्यातून सुंदर असे काही का निर्माण होऊ नये? हेच मी कामाचे सूत्र ठेवले. पूर्वी एखादी वास्तू उभी करायची तर निवड झालेल्या वास्तुविशारदाकडून सादर झालेल्या आरखडय़ानुसार ती वास्तू उभी केली जायची. ती पद्धत आम्ही बदलली. आम्ही एकाच वास्तूसाठी तीनजणांकडून आराखडे मागवण्याची पद्धती आणली. त्यामुळे आता तज्ज्ञ सल्लागार, वास्तुविशारद यांनाही चांगले काही तरी करून दाखवण्याची संधी मिळते. त्यामुळे अधिकाधिक चांगले प्रस्ताव येऊ लागले.
या नव्या कल्पनांचे स्वागत झाले का विरोध वगैरे झाला?
आम्ही चांगल्या पद्धतीने काम सुरू केल्यामुळे स्वाभाविकच पुणेकरांकडून कौतुक होऊ लागले. शहरात उभी राहिलेली नाटय़गृह, कलादालने बघितल्यानंतर सर्वाचाच आमच्यावरचा विश्वास वाढला. सुंदर वास्तूंची निर्मिती महापालिका स्तरावर आम्ही करू शकतो, हा विश्वास आम्ही देऊ शकलो. त्यामुळे पुढील वास्तुनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वाचेच चांगले साहाय्य मिळत गेले.
महापालिकेच्या वास्तू उभ्या करताना तुम्ही कोणता दृष्टिकोन ठेवला होतात?
रंगमंदिरे, नाटय़गृह, कलादालन अशा वास्तू उभ्या करताना इतिहास, कला आणि संस्कृती या साऱ्यांचा तपशीलवार विचार केला तर चांगले काम उभे राहू शकते. तसे ते झाले. मुख्य म्हणजे या पद्धतीने विचार केल्यामुळे अशा वास्तूंकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टीदेखील निर्माण होत गेली. अशा वास्तू बांधताना आपल्या कला, परंपरा जपणे, त्या वाढीस लागतील यासाठी आवश्यक ते उपाय करणे हेही महत्त्वाचे असते. नाटय़गृह, कलादालने अशा वास्तू ही आपली सांस्कृतिक केंद्र आहेत. या वास्तूंकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, या वास्तूंबाबत विचार करण्याची आमची जी विचार पद्धती होती ती आम्ही बदलली. त्याचा फायदा झाला. कला-परंपरा यांचा सखोर विचार होत नव्हता. तो सुरू झाल्यामुळे इमारतींचे सुशोभन, सौंदर्य, रंगसंगती, भव्यता, देखणेपण आदी अनेक बाबींकडे लक्ष दिले गेले. त्यातून नवनवीन कल्पना पुढे आल्या आणि त्यातून चांगले काम होऊ शकले.
आतापर्यंतच्या कामातून काय साधले असे वाटते?
महापालिकेच्या इमारतींकडेही नागरिक सौंदर्यदृष्टीने पाहू लागले आहेत हा मोठा टप्पा मी गाठला आहे. या विषयावर मी आता भाष्य करू शकतो, एवढा अनुभव जमा झाला आहे. लोकांकडून या वास्तूंचे, कामाचे आवर्जून कौतुक होते. नवे कोणते काम सुरू आहे याची विचारणा होते, हे माझ्या दृष्टीने सुचिन्ह आहे. काम करत असताना सौंदर्याला, कलात्मकतेला प्राधान्य दिले. ज्या ज्या संधी आल्या त्यांचे सोने करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक देखणी कामे हातून उभी राहिली याचाही निश्चितच आनंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 3:24 am

Web Title: citizens applause beautiful building
टॅग : Building
Next Stories
1 संरक्षणमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे बोपखेल-खडकी उड्डाणपुलाचा विषय मार्गी
2 सुशिक्षित ठरत आहेत सायबर भामटय़ांचे बळी…
3 हेल्मेटबाबत ‘आरटीओ’कडून केवळ प्रतिज्ञापत्राचे सोपस्कार