महापालिका अंदाजपत्रकातील जी कामे न होण्याची शक्यता दिसली की त्या कामासाठीचा निधी दुसऱ्याच कामासाठी वळवण्याचे शेकडो प्रकार दरवर्षी घडत आहेत. त्यामुळे वर्गीकरणाचे हे प्रस्ताव दरवर्षी गाजतात आणि काही प्रस्ताव वादग्रस्तही ठरतात. त्या बरोबरच आता चालू अंदाजपत्रकातही नागरिकांनी सुचवलेले एक विकासकाम पळवण्याचा प्रकार समोर आला आहे.
चालू वर्षांच्या महापालिका अंदाजपत्रकात सिंहगड रस्ता येथील सर्वेक्षण क्रमांक २९ मध्ये आनंदनगर शुभकंर बंगला ते ओढय़ापर्यत पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम नागरिकांनी सुचविले होते. मात्र प्रत्यक्षात हेच काम दाखवून प्रत्यक्षात विठ्ठलनगर येथे गरज नसताना पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात नागरिकांनी सुचविलेले विकासकामही पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात सिंहगड रस्ता येथील सर्वेक्षण क्रमांक २९ मध्ये आनंदनगर शुभंकर बंगला ते ओढय़ापर्यंत पावसाळी वाहिनी टाकण्याचे हे काम नागरिकांनी सुचविले होते. मात्र प्रत्यक्षात विठ्ठलनगर येथे गरज नसताना हे काम करण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेउन चुकीच्या पद्धतीने केलेले काम रद्द करावे व तेथील पावसाळी वाहिन्या काढून घ्याव्यात, अशी मागणी नगरसेविका नागपुरे यांनी केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. कामाबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित उपायुक्तांनी सात दिवसात चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही असे नागपुरे यांनी सांगितले.
काय आहेत नागरिकांची कामे
महापालिका अंदाजपत्रकात नागरिकांनीच त्यांना आवश्यक वाटणारी त्यांच्या प्रभागातील छोटी कामे प्रशासनाला सुचवावीत असा प्रयोग गेली काही वर्षे महापालिकेत यशस्वीरीत्या सुरू आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्था देखील पुढाकार घेऊन नागरिकांच्या बैठका घेतात. तसेच महापालिका अंदाजपत्रकात विकासकामे सुचवण्यासाठी काय केले पाहिजे ते नागरिकांना समजावून देतात. गेल्या काही वर्षांतील या उपक्रमाचा अनुभव चांगला असून नागरिकांनी अनेक चांगली कामे या उपक्रमासाठी सुचवली आणि त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूदही केली गेली. ही कामे कशा पद्धतीने सुचवता येतात, त्यासाठी तरतूद कशा प्रकारे केली जाते याची माहिती देखील स्वयंसेवी संस्था नागरिकांना देत असल्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढल्याचे चित्र आहे.