मुदत वाढवूनही अडचणी दूर होण्याबाबत साशंकता

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी सोमवारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी तसेच सव्‍‌र्हर डाऊन अशा तांत्रिक बाबींचा फटका पुणेकरांना बसला. विवरण पत्र भरण्यासाठी ३१ जुलै शेवटचा दिवस असल्याने सनदी लेखापालांची कार्यालये तसेच प्राप्तिकर भवन येथे करदात्यांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. आधारनोंदणी न केल्याने आणि आधार व पॅनकार्ड जोडणी न केल्याने अनेक नागरिकांना फटका बसला असून ५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवूनही अडचणी दूर होण्याबाबत सनदी लेखापालांकडून साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

प्राप्तिकर भवन आणि सनदी लेखापालांच्या कार्यालयात सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यालयात एकाच वेळी अनेकांचे विवरण भरण्यात येत असल्याने बहुतांशी वेळा सव्‍‌र्हर डाऊन असाच संदेश संगणकावर येत होता.

‘यंदा आधार आणि पॅन कार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्याने आणि बहुतांशी आधार केंद्रे सुरू नसल्याने नागरिकांना जोडणी करता आलेली नाही. आधार आणि पॅन कार्डमध्ये तफावत असलेल्या नागरिकांना आधार अद्ययावत करता न आल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. सोमवारी अंतिम दिवस असल्याने शेवटच्या चार-पाच दिवसांत अनेकजणांनी विवरण भरण्याकरिता प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर गर्दी केल्याने त्यावर भार येऊन संकेतस्थळ कासवगतीने कार्यरत होते. ५ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ पुरेशी असून विवरण केवळ वेळेत न भरण्याकडे नागरिकांचा कल असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.’ असे सनदी लेखापाल यशवंत कासार यांनी सांगितले.

आधार जोडणी होत नसल्याने आधारविना प्राप्तिकर विवरण भरता येईल, असे मध्यंतरी जाहीर करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात विवरण भरताना आधारशिवाय पुढे प्रक्रियाच होत नव्हती. तसेच आधार आणि पॅन कार्ड जोडणी बंधनकारक केल्याने आधार व पॅनकार्डवरील माहिती तंतोतंत जुळणे आवश्यक होते. परंतु, आधार कार्ड काढल्यानंतर त्यावरील नाव, जन्मदिनांक यांचे संकलन करताना त्याबाबत खातरजमा करण्यात न आल्याने त्याचा सर्वाधिक फटका प्राप्तिकर विवरण भरताना नागरिकांना होत आहे. नावाचे स्पेलिंग, जन्मदिनांक आणि वर्ष यामध्ये चुका असल्याने पॅन कार्ड आणि आधार जोडणी होत नाही. तसेच शहर, जिल्ह्य़ातील आधार केंद्रांचा बोजवारा उडाल्याने आधार नोंदणी, अद्ययावतीकरण नागरिकांना करता आलेले नाही.

याबाबत बोलताना सनदी लेखापाल चंद्रकांत काळे म्हणाले, ‘प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी ३१ जुलै हा शेवटचा दिनांक असल्याने सव्‍‌र्हरवर ताण आल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी, परिस्थितीत फार काही फरक पडेल असे वाटत नाही’.

सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ व्यवस्थित कार्यान्वित होते. मात्र, त्यानंतर एकाच वेळी अनेकजणांकडून संकेतस्थळावर विवरण पत्र भरण्यात येत असल्याने यंत्रणा कोलमडून त्यावर माहिती भरणे किंवा माहिती अद्ययावत करणे अशक्य झाले.

५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे लेखी आदेश प्राप्त झालेले नसल्याने अधिकृतपणे मुदतवाढीबाबत सांगता येणार नसल्याचे स्वारगेट येथील प्राप्तिकर कार्यालयाकडून सांगण्यात आले. परंतु, माध्यमांमधून मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.