दोषींवर कारवाईची मागणी

महावितरण कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराकडून रीडिंग घेण्यासाठी वीज मीटरचे छायाचित्र व्यवस्थित काढले जात नसल्याने नागरिकांना चुकीची आणि अवास्तव बिले मिळत आहेत. चुकीची बिले आल्यानंतर ती दुरुस्त करण्याठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत.

महावितरणच्या भोसरी विभागाच्या अंतर्गत वीज मीटरच्या छायाचित्रासह रीडिंग घेण्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. मीटरचे छायाचित्र काढण्यासाठी ठेवलेल्या कामगारांकडून चुकीच्या पद्धतीने छायाचित्रे काढले जात आहेत. त्यामुळे रीडिंगचे आकडे स्पष्ट दिसत नाहीत. अंदाजे बिल लावले जाते. त्यातून घोळ होतात. वापरापेक्षा जास्त बिल आल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिल दुरुस्तीसाठी गेल्यानंतर नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. बिल दुरुस्तीसाठी ताटकळत बसावे लागत.

दिवसभराचे काम ठप्प होते, त्यामुळे आर्थिक नुकसानीचा सामनाही करावा लागतो. या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे यांनी केली आहे.

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल वरपे यांनी सांगितले, की चुकीचे बिल आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मीटरचे रीडिंग अस्पष्ट असल्यामुळे तसे काही प्रकार घडले आहेत. यापुढे छायाचित्र न काढता मीटरचे रीडिंग घेण्यासाठी महावितरणने मोबाइल अ‍ॅप विकसित केला आहे. त्यामुळे येथून पुढे चुकीची बीले येणार नाहीत.