सिंहगड रस्त्यावरुन जाणारी भरधाव वाहने, वाहतूक पोलिसांची अरेरावी, वाहतूक नियमनाऐवजी कारवाईवर भर, अशा अनेकविध तक्रारी नागरिकांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापुढे सोमवारी मांडल्या.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सोमवारी दत्तवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांनी वाहतुकीच्या समस्यांचा पाढा पोलीस आयुक्तांसमोर वाचला. आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात दत्तवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. सिंहगड रस्त्यावरुन जड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सिंहगड रस्त्यावरुन मोठय़ा प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा वाहतूक पोलीस नागरिकांशी हुज्जत घालतात. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या दिव्यांपाशी न थांबता वाहतूक पोलीस अन्य ठिकाणी थांबतात, अशा तक्रारी नागरिकांनी या वेळी केल्या.
पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, की नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. तशा सूचना वाहतूक शाखेच्या पोलिसांना देण्यात येतील. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी सातत्याने प्रयत्न के ल्यामुळे साखळी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. वाहतुकीची समस्या गंभीर आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांच्या कामाचे कौतुक नागरिकांनी करणे गरजेचे आहे.