पिंपरी-चिंचवड : मोफत घरांची जाहिरात देऊन एका खासगी गृहकर्ज कंपनीने भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर येथे केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांचा सहनशीलतेचा बांध फुटला. हातात येईल ते साहित्य घेऊन नागरिकांनी इथल्या टेबल, खुर्च्या फेकून देण्याबरोबरच गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडली. पिंपरीतील महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमध्ये हे प्रदर्शन भरले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून गोंधळ घालणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच संबंधीत कंपनीची चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यासाठी सुमारे २ हजार नागरिक या ठिकाणी आले असल्याचे सुत्रांकडून कळते. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणाऱ्या शासकीय गृहकर्जासंदर्भातही येथे माहिती दिली जाणार होती. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काहींनी मोफत घरे देऊ अशा जाहिराती केल्याचा आरोप येथे उपस्थित नागरिकांनी केला आहे.

मोफत घरांच्या आशेने नागरिकांनी ऑनलाइन फॉर्म भरले होते. त्यांनी २५० रुपयेही खर्च केले होते. त्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठी गर्दीही केली होती. परंतू, प्रदर्शनात केवळ गृहकर्जाविषयी आणि बांधकाम व्यवसायकांबाबत माहिती मिळत असल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि येथे जमलेल्या ५०० ते ६०० नागरिकांनी धिंगाणा घालत तुफान तोडफोड केली.