25 September 2020

News Flash

वादग्रस्त कवितेसंदर्भातील दावा वीस वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात

महात्मा गांधी यांच्यावरील कविता अश्लील असल्याचा आरोप करून विद्याधर अनास्कर यांनी तक्रार दाखल केली होती. हा दावा सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्याबद्दलचा निकाल

| April 23, 2015 03:17 am

‘ऑल इंडिया बँक असोसिएशन’च्या द्वैमासिकात प्रकाशित झालेल्या महात्मा गांधी यांच्यावरील एका वादग्रस्त कवितेच्या संदर्भात वीस वर्षांपूर्वी दाखल झालेला दावा सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. ही कविता अश्लील असल्याचा आरोप करून बँकिंग साक्षरता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही तक्रार दाखल केली होती. या संदर्भात गेल्या वीस वर्षांत आपल्यावर काही आरोप करण्यात आल्याचे सांगून अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत मूळ तक्रारदार म्हणून आपली बाजू मांडली.
 या तक्रारीमागे बँक ऑफ महाराष्ट्रमधील कम्युनिस्ट संघटना व संघ परिवाराची संघटना यांच्यामधील वादाची किनार आहे, तसेच अंतर्गत हेव्यादाव्यांपोटी ही तक्रार करण्यात आली असे अनेक आरोप आपल्यावर झाले, असे अनास्कर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी पतित पावन संघटनेचा कार्यकर्ता असलो तरी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तसेच या वादग्रस्त कवितेचे कवी व प्रकाशक यांच्याशी माझे व्यक्तिगत वितुष्ट नाही. या कवितेबद्दल मी कवी व प्रकाशकांशी बोलून त्यांना पुढील अंकात दिलगिरी व्यक्त करण्याची विनंती केली होती. तसे न झाल्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार केली. उच्च न्यायालयाने कविता अश्लील असल्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतरही सेन्सॉर बोर्डाने या कवितेत काहीही अश्लील नसल्याचे सांगितले. त्यानंतर दावा सर्वोच्च न्यायालयात गेला.’’
१९९४ मध्ये मुंबईचे कवी वसंत गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता ‘ऑल इंडिया बँक असोसिएशन’च्या द्वैमासिकात प्रकाशित झाली होती. त्या संदर्भात अनास्कर यांनी केलेल्या तक्रारीवरून कवी गुर्जर व मासिकाचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर यांच्यावर भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम १५३ (अ), १५३ (ब) आणि कलम २९२ अनुसार गुन्हा दाखल झाला होता. २००१ मध्ये लातूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबंधितांना वरील कलमांतर्गत दोषी ठरवले होते. आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेले अपील २००२ मध्ये खंडपीठाने फेटाळून लावले. त्यानंतर हा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला. त्या संबंधित बाजू मांडण्याचे काम संपुष्टात आले असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:17 am

Web Title: claim regarding controversial poet in sc after 20 years
Next Stories
1 विमा लोकपालने दिला ज्येष्ठ नागरिकाला न्याय
2 राज्य शासनाचा इंग्रजी प्रसार
3 ‘फ्रिदा’ला अपेक्षा नाटय़प्रेमींच्या आर्थिक साहाय्याची!
Just Now!
X