न्यायालयाच्या आवारात चित्रीकरणावरून वाद

पुणे : अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याप्रकरणी झालेल्या वादातून एका आरोपीला न्यायालयात हजर करताना पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या चित्रीकरणास मज्जाव करण्यात आल्याने झालेल्या वादातून वकील आणि पोलिसांमध्ये शुक्रवारी दुपारी बारामती न्यायालयाच्या आवारात हाणामारी झाली.

न्यायालयाच्या आवारात चित्रीकरणास मनाई असल्याने वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर वादाला तोंड फुटले. बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी नगर अभियंता रमेश अभंगराव मोरे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांना विरोध करण्यात आला. त्यानंतर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बारामतीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शिवाजी भानुदास जाधव (वय ३९, रा. सावतामाळीनगर, बारामती), सुहास चंद्रकांत क्षीरसागर (वय ३२, रा.जगताप मळा, कसबा, बारामती), सागर राजेंद्र आगम (वय २३), प्रसाद बाळासाहेब आगम (वय २३, दोघे रा. श्रीरामनगर, बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.

शुक्रवारी दुपारी त्यांना बारामती न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी एक पोलीस कर्मचारी चित्रीकरण करत होता. न्यायालयाच्या आवारात चित्रीकरणास मनाई करण्यात आल्याने वकिलांनी आक्षेप घेतला. न्यायालयाच्या आवारात चित्रीकरणास मनाई आहे, असे वकिलांकडून सांगण्यात आले. या कारणावरून वकील आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

वकिलांचा एक गट आणि शिरगावकर यांच्यात चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटले. तेथे असलेले पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, वकील आणि पोलिसांमध्ये झालेला वाद तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध वकिलांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे.