15 December 2017

News Flash

आठवीसाठी यंदा संस्कृतचे नवे पुस्तक

नव्या रचनेत संभाषणावर भर

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 21, 2017 2:36 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

येत्या शैक्षणिक वर्षांपासून बदल; नव्या रचनेत संभाषणावर भर

आठवीची संस्कृतची पाठय़पुस्तके येत्या शैक्षणिक वर्षांपासून बदलणार असून नव्या रचनेत संभाषणावर भर देण्यात आला आहे. नववीला भाषेच्या वापरावर आधारित प्रश्न असलेल्या कृतिपत्रिकेची तयारी आता आठवीपासूनच असणार आहे. पुस्तकाचे स्वरूपही आकर्षक आणि सुटसुटीत करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी इयत्ता सातवी आणि नववीची पाठय़पुस्तके बदलणार असून त्याबरोबर इयत्ता आठवीचे संस्कृतचे पुस्तकही बदलणार आहे. आतापर्यंत मराठीतून अर्थ सांगून, मराठीतून सूचना देत संस्कृत शिकवण्यात येत होते. प्रश्नपत्रिकेतील सूचनाही मराठी किंवा ज्या भाषा माध्यमातून शिक्षण घेण्यात येत असेल, त्या भाषेतून दिल्या जात होत्या. नव्या पुस्तक रचनेत मात्र प्रश्नपत्रिकेतील सूचना, शब्दार्थ हे देखील संस्कृतमधूनच देण्यात आले आहेत. यापूर्वी व्याकरण आणि भाषारचनेच्या अभ्यासवर अधिक भर देण्यात आला होता. मात्र आता विद्यार्थ्यांना संस्कृतमधून संभाषण करता यावे अशा प्रकारे या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. स्वयंअध्ययन, कृतियुक्त मूल्यमापन, ज्ञानरचनावाद अशा आधुनिक संकल्पना या पाठय़पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणल्या जात आहेत, अशी माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली.

या वर्षी जुन्या पुस्तकांनुसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी नववीला नव्या रचनेनुसार अभ्यास करावा लागेल. ही तफावत राहू नये यासाठी संस्कृतच्या पुस्तकांत बदल करण्यात आला आहे, असे बालभारतीच्या विद्यासचिव धनवंती हर्डीकर यांनी सांगितले.

आठवीची पुस्तके पुढील वर्षीपासून बदलणार

आठवीची इतर विषयांची पुस्तके पुढील वर्षी बदलणार आहेत. मात्र फक्त संस्कृतचे पुस्तक यंदापासून बदलणार आहे. गेल्या वर्षीपासून नववी आणि दहावीला भाषा विषयांसाठी प्रश्नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिका’ देण्यात येते. विद्यार्थ्यांना भाषेचा वापर करता येतो का याचे मूल्यमापन होईल अशी याची रचना करण्यात आली आहे.  त्याची तयारी करण्यासाठी पुस्तकांत यंदाच बदल करण्यात आला आहे.

First Published on April 21, 2017 2:36 am

Web Title: class 8 sanskrit textbook change