वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी तरुणाईचा प्रयत्न

मुले असोत किंवा युवक रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आवड असली तरी वाचनासाठी सवड मिळत नाही. अशा लोकांसाठी वाचन आणि वेळ यांची सांगड घालणारा ‘बुकशेल्फ’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. अभिजात पुस्तकाचा केवळ १५ मिनिटांत परिचय करून देणाऱ्या या ऑनलाइन उपक्रमात वाचन आणि श्रवणाचा मिलाफ करण्यात आला आहे.

वाचनसंस्कृती जोपासतानाच युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. वाचनाची आवड असली तरी नेमके काय वाचायचे, असा प्रश्न असतोच. वाचन आणि वेळ यांचा मेळ जमवायचा कसा, या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘बुकशेल्फ’ या नावीन्यपूर्ण ऑनलाइन उपक्रमातून सोडवण्याचा मार्ग तरुणाईने शोधून काढला आहे. मराठीतील अभिजात साहित्य, नवोदित लेखकांचे वैशिष्टय़पूर्ण लेखन अशा पुस्तकांच्या जगाची सफर या उपक्रमातून करायला मिळणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘रूपवेध’ या पुस्तकाने ‘बुकशेल्फ’ उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. विविध भूमिका, त्या साकारताना त्यामागची त्यांची विचारप्रक्रिया, सहकलाकारांसोबतच्या संबंधांबरोबरच सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादापर्यंतच्या घडामोडी असा मराठी रंगभूमीचा कालखंड उलगडणारे पुस्तक म्हणून ‘रूपवेध’चे महत्त्व मोठे आहे. सुरुवातीला प्रत्येक पुस्तकासाठी दोन आठवडय़ांचा कालावधी दिला जाणार आहे. या पुस्तकाची ओळख साधारणपणे १५ मिनिटांच्या अवधीत करून देण्याचा प्रयत्न असेल.

‘बुकशेल्फ’बाबत किरण क्षीरसागर म्हणाला, पुस्तक ही या उपक्रमाची मध्यवर्ती कल्पना आहे. पुस्तकाच्या लेखकांना बोलते करणे, लेखकांच्या एकत्रित गप्पा, एका लेखकाचे दुसऱ्या लेखकाच्या साहित्यकृतीविषयीचे मत जाणून घेणे अशा प्रकारे बुकशेल्फ समृद्ध होत जाईल. वाचकांमध्ये पुस्तकांविषयी कुतूहल निर्माण करीत त्यांना वाचनासाठी उद्युक्त करणे, हा या मागचा उद्देश असून हा उपक्रम विनामूल्य आहे. पुढच्या टप्प्यात हमीद दलवाई यांचा ‘जमिला जावेद’ हा कथासंग्रह आणि ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या पुस्तकांचा परिचय करून दिला जाणार आहे. यामध्ये पुस्तकातील निवडक भागाचे वाचन, माहिती, अभिवाचन, गप्पा अशी मेजवानी वाचकांना अनुभवता येणार आहे. वाचकांचा अभिप्राय हा या उपक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. बुकशेल्फ उपक्रमामध्ये किरणसह हिनाकौसर खान-िपजार, सूरज क्षीरसागर, भारतेंद्रू शर्मा या युवकांचा सहभाग आहे.