News Flash

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची दहा तपांची वाटचाल

१२१ व्या वर्षांत पदार्पण करताना संस्थेने काही ध्येयधोरणे ठेवून वाटचाल करण्याचे निश्चित केले आहे.

गांधर्व महाविद्यालयाचे आज १२१ व्या वर्षांत पदार्पण; करोना प्रादुर्भावामुळे कामकाजामध्ये काहीसा खंड

पुणे : गुरु-शिष्य परंपरेनुसार शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण देण्याबरोबरच अभिजात संगीताला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या गांधर्व महाविद्यालयाने दहा तपांची वाटचाल पूर्ण केली आहे. १२१ व्या वर्षांत पदार्पण करताना संस्थेने काही ध्येयधोरणे ठेवून वाटचाल करण्याचे निश्चित केले आहे.

संगीत शिक्षणाची वाट सुकर करण्याबरोबरच स्वरलिपी लेखनाचे तंत्र विकसित करणारे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी ५ मे १९०१ रोजी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती. या घटनेला बुधवारी (५ मे) १२० वर्षे पूर्ण होत आहेत. १९३१ मध्ये पंडितजींचे निधन झाल्यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना झाली. संस्थेच्या देशभरात विविध ठिकाणी एक हजारांहून अधिक शाखा कार्यरत आहेत. सध्या करोना प्रादुर्भावामुळे संस्थेच्या कामकाजामध्ये काहीसा खंड पडला असला तरी लवकरच संस्था पूर्ण क्षमतेने काम करेल, असे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी सांगितले.

संगीत शिक्षणाचा मार्ग सुलभ करून देणारे पलुसकर हे द्रष्टे होते, असे सांगून डॉ. कशाळकर म्हणाले, पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य असलेल्या पलुसकर यांनी संगीताला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी १८९६ मध्ये भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. गायन मैफली करत ते लाहोर येथे पोहोचले. तेथे त्यांनी ५ मे १९०१ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. वाद्यनिर्मितीचा कारखाना आणि ‘संगीत अमृत प्रवाह’ हे मासिक सुरू केले होते. पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकबुवा पटवर्धन, शंकरराव व्यास, नारायणराव व्यास, बी. आर. देवधर यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा सुरू केल्या. पुण्यामध्ये पं. पटवर्धन यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालयामध्ये पं. डी. व्ही. पलुसकर यांचे शिक्षण झाले होते. सध्याच्या करोना काळामध्ये संगीत शिकण्यासाठी पालक विद्यार्थ्यांना पाठवत नाहीत. संगीताच्या परीक्षा घेता येत नाहीत, या अडचणींकडे कशाळकर यांनी लक्ष वेधले.

पदव्यांना मान्यता मिळविण्याचे प्रयत्न

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विशारद (बी. ए.), अलंकार (एम. ए.) आणि संगीताचार्य (पीएच. डी.) या पदव्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये संगीत विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडीट गुण मिळणार आहेत, असे डॉ. विकास कशाळकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:34 am

Web Title: classical music education akp 94
Next Stories
1 नगरसेवकांना ‘स्वच्छ’चे वावडे
2 झोपडीधारकांच्या गृहनिर्माण संस्था
3 एप्रिल महिन्यात १९०० पुणेकरांचा करोनाने मृत्यू
Just Now!
X