13 July 2020

News Flash

स्वच्छता अभियान – झाडूंची विक्री वाढली

वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून पन्नास, शंभर असे एक गठ्ठा झाडू खरेदी करण्यात आले. काही भागातील किरकोळ दुकानांमध्ये गुरुवारी झाडू मिळेनासे

| October 3, 2014 03:25 am

देशभरात स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली आणि झाडू घेऊन फोटो काढण्यासाठी सरकारी, खासगी कार्यालयांकडून मोठय़ा प्रमाणात झाडूंची खरेदी झाली. एका दिवसात शहर चकचक झाले नसले, तरीही झाडू विक्रेत्यांची मात्र चांगलीच चांदी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजयंतीपासून देशभरात स्वच्छता अभियान सुरू करण्याचा नारा दिला. सरकारी, निमसरकारी कार्यालयांना अभियान सुरू केल्याचे अहवाल पाठवण्याचे आदेश निघाले. त्यामुळे सकाळी सरकारी आणि खासगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेतला. या अभियानामुळे शहर एका दिवसात स्वच्छ झाले नसले, तरीही झाडू विक्रेत्यांची मात्र चांदी झाली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यातील विक्रीच्या तुलनेत दुपटीने झाडूंची विक्री अवघ्या दोन दिवसात झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून पन्नास, शंभर असे एक गठ्ठा झाडू खरेदी करण्यात आले. काही भागातील किरकोळ दुकानांमध्ये गुरुवारी झाडू मिळेनासे झाल्याचेही काही संस्थांकडून सांगण्यात आले. याबाबत झाडूचे विक्रेते सुयोग सपकाळ यांनी सांगितले, ‘‘झाडूची लक्ष्मी मानून पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहेच. त्याप्रमाणे गांधीजयंतीलाही स्वच्छताही केली जाते. त्यामुळे दरवर्षीच या दिवसांमध्ये झाडूला मागणी असतेच. मात्र, या वर्षी स्वच्छता अभियानामुळे विक्री मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. अनेक संस्था, संघटनांनी एकदम शेकडय़ात झाडूंची खरेदी केली आहे.’’
कार्यालये, कंपन्या, स्वयंसेवी संस्थांचे उपक्रम, शाळा, महाविद्यालये यांच्याबरोबरच अनेक रहिवासी सोसायटय़ांमध्येही ‘स्वच्छता अभियानाचा’ इव्हेंट साजरा झाला. काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अभियान राबवले, तर काही शाळांनी बुधवारीच अभियानाची सुरुवात करून गांधीजयंतीची रीतसर सुट्टी घेतली. उमेदावारांनाही हे अभियान पर्वणीच ठरली. अनेक उमेदवारांनीही स्वच्छता अभियान राबवले, काहीजण इतरांच्या मोहिमेत सहभागी झाले. ठिकठिकाणी स्वच्छतेच्या शपथा घेतल्या गेल्या. स्वच्छता, गांधीजींचे विचार यावर भाषणबाजीही झाली. नेहमीसारख्याच कडक पोशाखात असलेले अधिकारी रस्ते किंवा कार्यालय परिसरात झाडू घेऊन दिसत होते. आपला फोटो काढला जातोय, याकडे आवर्जून लक्ष ठेवले जात होते. तोंडाला रुमाल, ग्लोव्ह्ज आणि हातात झाडू.. असे सेल्फी सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर दिवसभर झळकत होते. अनेकांनी जिथे कमी कचरा असेल, अशी ठिकाणे निवडून या अभियानाची सुरुवात केली. मात्र, काही संस्था, संघटना, तरुण मुलांचे गट यांनी नदीपात्राचा परिसर, सार्वजनिक वाहनतळ अशा ठिकाणी स्वच्छता केली.
कचरा कुंडय़ा वाहत्याच
देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असले, तरीही शहरातील अनेक भागातील कचराकुंडय़ा ओसंडून वाहातच होत्या. सिंहगड रस्ता, कात्रज, स्वारगेट अशा शहरातील अनेक भागातील कचराकुंडय़ा उचलण्यात आल्याच नव्हत्या. अनेक ठिकाणी कचराकुंडय़ा उचलल्या असल्या तरीही त्याच्या आजूबाजूचे कचऱ्याचे ढीग, घोंगावणाऱ्या माशा आणि पसरलेली दुर्गंधी हे चित्र कायम होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2014 3:25 am

Web Title: clean campaign broom sale gandhi jayanti
Next Stories
1 हुबेहूब नरेंद्र मोदी करणार भाजपचा प्रचार
2 ‘दो मुठ्ठी अनाज’मधून जमली धान्यराशी
3 कष्टाची भाकर’ नाबाद ४० वर्षे!
Just Now!
X