‘मास कॉपी’ झाली या कारणासाठी परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यास बंदी घालूनही क्लीनचिट दिलेल्या एका महाविद्यालयामधील सोयी सुविधांबाबत विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालासंबंधीच प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाविद्यालयामध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक नसतानाही, पुरेसे मान्यताप्राप्त शिक्षक असल्याचे पत्र समितीने दिले असल्याचे समोर येत आहे.
पुणे जिल्ह्य़ातील डुंबरवाडी (ता. ओतूर) येथील ‘शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’ आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे पुण्यातील ‘अभियांत्रिकी महाविद्यालय’ अशी दोन महाविद्यालयांची नावे आहेत. तिथे गेल्या वर्षी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षांमध्ये ‘मास कॉपी’चे प्रकार उघडकीस आले होते. या पाश्र्वभूमीवर परीक्षा मंडळाने या दोन्ही महाविद्यालयांवर परीक्षा केंद्र म्हणून बंदी घातली होती. मात्र, परीक्षा मंडळाच्या या निर्णयाचे उल्लंघन करून परीक्षेच्या दिवशी या महाविद्यालयांना परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ६ मे रोजी प्रसिद्ध केले होते. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र, तरीही या महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
या प्रकरणी आता आणखीच सुरस कथा पुढे आल्या आहेत. यापैकी डुंबरवाडी (ता. ओतूर) येथील ‘शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’ या महाविद्यालयामध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहणी करण्यासाठी गेलेल्या समितीने परीक्षा विभागाला दिलेल्या पत्रात महाविद्यालयात पुरेशा प्रमाणात शिक्षक आणि सुविधा आहेत. त्यामुळे महाविद्यालयाला परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात यावी, असे म्हटले होते. प्रत्यक्षात या महाविद्यालयामध्ये ५६ मान्यताप्राप्त शिक्षकांची आवश्यकता असताना १४ शिक्षकच कार्यरत आहेत. या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी पदवीसाठी कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल अशा तीन शाखा आहेत. त्यामध्ये प्रत्येक शाखेसाठी १६ मान्यताप्राप्त शिक्षक आवश्यक आहेत. प्रत्यक्षात कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल शाखेसाठी प्रत्येकी १ आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन शाखेसाठी ४ मान्यताप्राप्त शिक्षक आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकही शिक्षक मान्यताप्राप्त नसल्याचे समजते.
त्याचप्रमाणे परीक्षा मंडळाचा निर्णय फिरवून महाविद्यालयांना कुलगुरूंनी त्यांच्या अधिकारात क्लीनचिट दिल्याचे आतापर्यंत बोलले जात होते. मात्र, ज्या पत्राच्या आधारे या महाविद्यालयांना तडकाफडकी क्लिनचिट देण्यात आली, त्या पत्रावर विद्यापीठातील फक्त समितीच्या सदस्यांची स्वाक्षरी आहे.