जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचारावरून तुझ्यावर चिखलफेक झाली खरी. त्याचे वाईट वाटले. पण, तू तसा नाहीस, अशा शब्दांत अभिनेता नाना पाटेकर याने सुनील तटकरे यांना गुरुवारी ‘क्लीन चिट’ दिली. अजितदादा परखड आहे. त्यांची कामाची पद्धत चांगली आहे. ते मुख्यमंत्री झाले, तर मला खूप आवडेल, अशी टिपणीही त्याने केली.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावरील ‘कोकणरत्न’ या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर याच्या हस्ते झाले. आमदार जयदेव गायकवाड, बापू पठारे, लेखक सुधीर शिंदे, महापालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ या वेळी उपस्थित होते.
आम्ही तुमच्याकडे काही घरे मागत नाही. पाणी, वीज आणि चांगले रस्ते द्यायला हवेत. हे देण्यामध्ये कोणी चूक करत असेल, तर त्याला शिक्षा करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सांगून नाना म्हणाला, आसाराम-तसाराम हे कोण मला नाहीत नाही. माझा राम मी दुसऱ्यामध्ये शोधत असतो. आपण गेल्यावर दुसऱ्यांच्या डोळ्यात एक थेंब पाणी येते, तीच खरी आपली संपत्ती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ द्यावा. आरोपी पकडले जातीलही. पण, दाभोलकर परत येणार नाहीत. पोलिसांसमवेत मी काम केले आहे. गुन्हे वाढले असून पोलिसांची संख्या कमी आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळाले असतीलही. पण, तपासचा भाग पूर्ण होईपर्यंत ते जाहीर करीत नसावेत.