दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये सफाई अभियान सुरु आहे. महिला घरातील स्वच्छता करण्यामध्ये मग्न आहेत. जो कचरा गोळा होतोय, तो तसाच कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या गाडीत टाकला जातो. घराची सफाई करताना एका महिलेने सुनेसाठी बनवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स कचऱ्यासह गाडीत टाकून दिली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट मोशी येथे संपर्क साधला.  सफाई कर्मचारी हेमंत लखन यांनी १८ टन कचऱ्यातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची ती पर्स शोधून परत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी घंटा गाडीने कचरा गोळा करण्यात आला. तो मोशी येथील कचरा डेपोत खाली करण्यात आला. दरम्यान, एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पर्ससह कचऱ्यात गेल्याचं सांगितलं. संबंधित महिलेने दिवाळीनिमित्त घरातील सफाईचे काम सुरू होते. तेव्हा, काही विचार न करता ती पर्स वापरातील नसल्याने तशीच कचऱ्यात टाकून दिली. नंतर हा प्रकार लक्षात आला.

याची माहिती मोशी येथील कचरा डेपोतील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांना देण्यात आली. संबंधित महिलेला समक्ष बोलवून १८ टन कचऱ्यातून महिलेची पर्स शोधून त्यातील पाच ग्रॅम सोन्याचे पेंडल आणि चांदीचे जोडवे त्यांना परत केले. यावेळी हेमंत लखन म्हणाले की, “सोने-चांदी किती आहे हे म्हत्वाचे नाही. त्या महिलेने कष्टाच्या पैशातून त्यांनी ते सोने सुनेसाठी बनवले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचे होते.”