कामकाज ५ जूनपर्यंत बंद राहणार
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या आवारात गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेली कागदपत्रे, जळमटे लागलेल्या फाईल्स आणि किरकोळ स्वरुपाच्या अर्जाचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस. बी. सावळे यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यातील नऊ विभागांमधील कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील कार्यालयात हे काम ५ जूनपर्यंत चालणार आहे. या मोहिमेमुळे कामकाजावर परिणाम होणार असला तरी धर्मादाय आयुक्त कार्यालय चकाचक होण्यास मदत होणार आहे.
शासकीय कार्यालयांच्या आवारात वर्षांनुवर्षे साठलेल्या कागदपत्रांचा निपटारा कसा करायचा हा प्रश्न आहे. या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांची विल्हेवाट लावावी लागते. न्यायालय आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अनेक प्रकरणात महत्त्वाचे निकाल दिले जातात. एखादे प्रकरण दाखल करताना त्याच्यासोबत कागदपत्रेही सादर करावी लागतात. त्यामुळे न्यायालय आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयात कागदपत्रांचे अक्षरश: ढीग लागतात. या कागदपत्रांचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस. बी. सावळे यांनी नुकतेच दिले आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे राज्यात नऊ विभाग आहेत. या कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम अर्थात जुन्या फाईली आणि कागदपत्रांचा निपटारा करण्यास सुरुवात झाली आहे.
धर्मादाय आयुक्तांचे पुणे विभागातील कार्यालय ढोले-पाटील रस्त्यावर आहे. स्वच्छता मोहिमेसाठी हे कार्यालय ५ जूनपर्यंत बंद राहणार आहे. यासंदर्भात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले की, धर्मादाय आयुक्त कार्यालयात कागदपत्रे पडून आहेत. किरकोळ स्वरुपाचे अर्ज किंवा प्रकरणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल होत असतात. त्यांचा निपटारा करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून कागदपत्रांचा निपटारा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कागदपत्रांचे ढीग जमा झाले आहेत. काही अर्ज हे विशिष्ट मुदतीतील आहेत. त्यामुळे त्यांचे जतन करणे योग्य ठरत नाही. अशी कागदपत्रे आणि फाईलींचा निपटारा करण्याच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय ५ जूनपर्यंत बंद राहील. हे काम सुरू असल्यामुळे तूर्त पक्षकारांची थोडी गैरसोय होईल. सोमवारपासून (६ जून) कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरू होईल.

पुणे-मुंबईसह नऊ विभागातील कार्यालयांमध्ये साचलेल्या जुन्या कागदपत्रांचा निपटारा करण्यात येणार आहे. काही जुने निकाल, आदेश आणि कागदपत्रांचे जतन करण्यात येणार आहे. मात्र, अल्प मुदतीतील अर्ज आणि कागदपत्रांचा निपटारा करण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या कागदपत्रांचा निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयांचे आवार चकाचक होईल.
अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन