News Flash

शहर स्वच्छतेसाठी झटणाऱ्या सेवकांवर मुजोर नागरिकांची दंडेलशाही

सफाई कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार

तानाजी देवकुळे

सफाई कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार

पुणे : शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि स्वच्छ भारत अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा ठसा उमटावा, यासाठी मध्यरात्रीही काम करत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मुजोर नागरिकांची दंडेलशाही सहन करावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्यास सफाई कर्मचाऱ्यांकडून अटकाव होत असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करणे, महिलांना कर्मचाऱ्यांना शिवीगाळ असे धक्कादायक प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शहर स्वच्छतेबाबतची नागरिकांची असंवेदनशीलताही अधोरेखीत झाली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशपातळीवर अव्वल ठरावे, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र स्वच्छतेची कामे केली जात आहेत. कचरा वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी पडलेला राडारोडा उचलणे, रस्त्यांचे विविध पाळ्यांमध्ये झाडणकाम करणे, अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना दंड करणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी कामे पंधरा क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत. त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांकडून पहाटेपर्यंत ही कामे केली जात आहेत.

शहरात अशी कामे सुरू असताना अस्वच्छता करण्यास अटकाव केला जात असल्यामुळे मुजोर नागरिकांकडून कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्यापासून अशा चार घटना घडल्या आहेत.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणारे मुकादम सूर्यकांत गवळी यांना ५ नोव्हेंबर रोजी नागरिकांनी मारहाण केली. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील महिला मुकादम सुनीता वीर यांना नागरिकांनी रात्री अर्वाच्च शिवीगाळ केली. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडील कर्मचारी लक्ष्मी खुडे यांनाही मारहाण झाली तर विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडील तानाजी देवकुळे यांनाही मारहाण करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करण्यास, रस्त्यावर कचरा टाकण्यास मज्जाव केला म्हणून नागरिकांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या कामगारांनी पुणे महापालिका कामगार युनियनकडे लेखी स्वरूपात तशा तक्रारीही केल्या आहेत. संघटनेकडूनही या घटनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून नागरिकांकडून असे प्रकार सुरू राहिले तर तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.

मारहाण का?

कचरा वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी पडलेला राडारोडा उचलणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी कामे सफाई कर्मचारी करत आहेत. रस्त्यांचे विविध पाळ्यांमध्ये झाडणकामही केले जात आहे. हे काम सुरू असताना अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना दंड करणे, रस्त्यावर कचरा टाकण्यास मज्जाव करणे ही कामेही केली जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ असे प्रकार होत आहेत.

महापालिका आयुक्तांनी या प्रकारत लक्ष घालून कामगार युनियन बरोबर बैठक घ्यावी. बैठकीत धोरण निश्चित करावे आणि स्वच्छ भारत अभियानाची मोहीम राबविण्यात यावी. स्वच्छता मोहिमेस युनियनचा विरोध नाही. मात्र कर्मचाऱ्यांवरील जीवघेणे हल्ले थांबणे अपेक्षित आहे.

– मुक्ता मनोहर, सरचिटणीस, कामगार युनियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 5:20 am

Web Title: cleaning staff assaulting incidents increasing in pune zws 70
Next Stories
1 पुणे-सातारा महामार्गाचे काम वेगाने करण्यासाठी पाठपुरावा सुरू
2 कृषी उत्पादनांपासून पर्यायी इंधनासाठी सरकार कटिबद्ध-गडकरी
3 फिनोलेक्स केबल्स ‘एमसीसीबी’ निर्मितीत
Just Now!
X