पुणे : प्लास्टिकबंदीमुळे सध्या किराणा माल किंवा भाजी खरेदी करताना अडचणी निर्माण होतात. कापडी पिशवी हा चांगला पर्याय असला, तरी नागरिकांकडून ती प्रत्येक वेळी जवळ बाळगली जात नाही आणि व्यापाऱ्यालाही ती देणे परवडणारे नाही. यावर पर्याय म्हणून पुण्यातील ‘ग्रीन ग्रोथ’ या पर्यावरणप्रेमी मित्रांच्या समूहाने कापडी पिशव्यांच्या बँकेचा उपक्रम सुरू केला आहे. हे तरूण कापडी पिशवी तयार करून व्यापाऱ्यांना देत असून, दहा रुपये अनामत रक्कम ठेवून ही पिशवी ते ग्राहकाला देऊ शकणार आहेत.

प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर व्यापारी आणि ग्राहक यांच्यासमोर पिशवीसाठी पर्याय शोधण्याची समस्या उभी राहिली. घराबाहेर पडताना कापडी पिशवी सोबत न बाळगल्यास ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. तरुणांच्या पिशवी बँक उपक्रमातून ही समस्या दूर होऊ शकते. सध्या हा उपक्रम प्रायोगित तत्त्वावर असला, तरी त्याची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘ग्रीन ग्रोथ’तर्फे दुकानदारांना दहा रुपयाला एक याप्रमाणे कापडी पिशव्यांची बँक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिवाय त्यावर संबंधित दुकानाच्या नावाची छपाईही करून दिली जाते. ग्राहकाला पिशवी हवी असल्यास त्यांनी दहा रुपये अनामत रक्कम दुकानदाराकडे ठेवायची. पिशवी परत दिल्यानंतर ही रक्कम दुकानदार ही रक्कम ग्राहकाला परत करेल, असा हा उपक्रम असल्याचे ‘ग्रीन ग्रोथ’चा यश माळवदकर याने सांगितले.

यश म्हणाला, की पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी ‘ग्रीन ग्रोथ’ समूहाअंतर्गत पर्यावरणप्रेमी एकत्र आले आहेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर होताच त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, बदल स्वीकारण्यासाठी आपणच पर्याय शोधायचा असे ठरवून आम्ही काम सुरू केले. घाऊक बाजारातून कापड खरेदी करून गरजू महिलांकडून त्याची १४ बाय १६ आकाराची पिशवी शिवून घेतली. त्यावर दुकानदारांचे नाव छापून घेतले. दुकानदारांना या कल्पनेबद्दल सांगताच त्यांनी बँक उपक्रमात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. त्याचप्रमाणे व्यापारी संघांच्या प्रतिनिधींना या उपक्रमाबद्दल माहिती देऊन त्यांचा सहभाग घेण्याबाबतही दुकानदारांनी तयारी दर्शविली आहे.