उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली दरम्यान, वायू चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण होणार असून येत्या 48 तास पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे हवामान निरीक्षण आणि वायू प्रदुषण विभागाचे प्रमुख डॉ. ए. कश्यपी यांनी दिली.

मुंबई किनारपट्टीपासून 260 किलोमीटर अंतरावर वायू चक्रीवादळ सक्रीय आहे. तसेच गुरूवारी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ पोरबंदर आणि महुआच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले. गोवा, कोकण आणि इतर किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 48 तासांमध्ये हीच परिस्थिती कायम राहिल. यामुळे भूजलपातळीत वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

गेल्या आठवड्यात केरळमध्ये धडकलेल्या मान्सूची प्रगती ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबली आहे. जूनच्या मध्यापासून मान्सून जोर पकडेल. परंतु त्याची प्रगती धीम्या गतीने होईल. तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भाला मान्सूनपूर्व पावसासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे, डॉ. कश्यपी म्हणाले. या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी पुन्हा उष्णतेची लाटेचा अनुभव येऊ शकतो. मराठवाडा आणि विदर्भातही उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. परंतु काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरीदेखील अनुभवता येतील. मान्सूला होणाऱ्या विलंबामुळे पेरणी प्रक्रियेलाही विलंब होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.