युवा राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांचा ठपका असलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांचा ‘कुशल संघटक’ असा गौरव करीत त्यांचे गुणगान करणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कृतीमुळे राजकीय श्रेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनी माझा गौरव का केला हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे सांगत कलमाडी यांनी ‘हे आपले कमबॅक’ नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रौप्यमहोत्सवी पुणे फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रजनी पाटील यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी हिंदूी हास्य कविसंमेलनाचा आनंद लुटला.
कलमाडी यांनी आपल्याला पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचा आग्रह केला होता. परंतु, नियोजित परदेश दौऱ्यामुळे मी येऊ शकलो नाही. मात्र, समारोपाला उपस्थित असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. खासदार कलमाडी हे कुशल संघटक आहेत. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने सर्वाना बरोबर घेऊन जात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे, अशा शब्दांत त्यांनी कलमाडींचे गुणगान गायले.
माझा गौरव का केला हे तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे यासंदर्भात कलमाडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी पुण्याचा खासदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करणे हे काही आपले राजकीय कमबॅक नाही, असेही ते म्हणाले.