राज्याच्या विकासामध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याबरोबरच नवीन उद्योगांच्या सोयीसाठी चाकण आणि नवी मुंबई येथे विमानतळ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
चाकण आणि नवी मुंबई येथील विमानतळासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, चाकण येथील नियोजित विमानतळासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) या जागेची पाहणी करून अहवाल देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नवी मुंबई येथील विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याबरोबरच अतिरिक्त जमीन संपादन करण्यात येणार आहे. या विमानतळाला जागा देणाऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने ‘जमिनीच्या मोबदल्यात जमीन’ हे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही विमानतळांबाबत राज्य सरकार गंभीर असून विमानतळ होणारच.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिमंडळ फेरबदल होणार का, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. याविषयी योग्य वेळी निर्णय मीच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेवाडी येथील दुर्दैवी घटनेसंदर्भात महसूल विभागातर्फे समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. यंदाच्या पावसाळ्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारच्या पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. त्यातूनही दुर्दैवाने अशी घटना घडलीच, तर ‘रेस्क्यू टीम’ तयार ठेवण्यात आली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी
स्वत: लक्ष देऊ – मुख्यमंत्री
‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’ची नियमावली अंतिम टप्प्यात असून ‘पुणे मेट्रो’चा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी आपण स्वत: लक्ष देऊ, असेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेतर्फे पर्यावरण जागृती उद्यान, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण उद्यान आणि संत रोहिदास उद्यानाचे नूतनीकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी, उल्हास पवार, अभय छाजेड, अरिवद शिंदे, अविनाश बागवे, विशाल तांबे, आयुक्त महेश पाठक या प्रसंगी उपस्थित होते. नियमांना धरून विकास करताना नागरी सुविधांवर ताण पडू नये याकरिता नगर अभियंते घडविण्यासाठी पुण्यामध्ये ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ ची दोन महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.