सेझच्या जागेवर चाकणचे नियोजित विमानतळ होणार असल्याच्या निर्णयावर दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत शिक्कामोर्तब झाले असतानाच, शासनाचा गृहपाठ कच्चा असून कशातच काही नसताना विमानतळ झाल्याची घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्टंटबाजी असल्याची टीका शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केली आहे. सेझची जागा निश्चित झाल्याचे सरकार सांगत असले तरी खुद्द बाबा कल्याणींना अंधारात ठेवण्यात आल्याचे आढळरावांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत
राजगुरूनगरजवळील जागेत विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात, भोसरीत ‘लोकसत्ता’ शी बोलताना आढळरावांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विमानतळाचा निर्णय झाल्याची आवई म्हणजे बाजारात तुरी..असा प्रकार आहे. २००१ मध्ये चाकण-बिरदवडीला विमानतळ करणार होते. तीन वर्षे गाजावाजा झाल्यानंतर विमान प्राधिकरणाने ती जागा योग्य नसल्याचे मत मांडले. नंतर, चांदूस-शिरोलीची निवड केली, तेथेही तीव्र विरोध झाला. तेव्हाही विमान प्राधिकरणाने त्या जागेस मान्यता दिली नाही. पुढे, कोये-धामणे-आसखेडची जागा निश्चित केली, तेथेही विरोधच झाला. वर्षेभरापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गर्जना करत असून ठोस निर्णय मात्र नाही. आता सेझची जागा ते सांगतात. मुळात नागपूर, वाशीसाठी आयोजित बैठकीत चाकणचा विषय घुसवला. तीन दिवसापूर्वी घाईने सव्र्हे केला. दिल्लीतून मंजुरीही मिळाली. मात्र, विमान प्राधिकरणाची स्पष्ट भूमिका नाही. १२०० हेक्टरपैकी ७५० हेक्टर बाबा कल्याणी यांची तर ५०० हेक्टर जमीन शेतकऱ्यांची असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. वास्तविक, आपणास अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही, असे कल्याणींनी आपल्याला सांगितले. औद्योगिक कारणांसाठी आरक्षित जागा अन्य कामाकरिता वापरता येत नाही. सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते. लोकांशी चर्चा नाही, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही. खासदार म्हणून आपल्याला विचारात घेत नाही, मग, विमानतळ कसे होणार, असा मुद्दा आढळरावांनी उपस्थित केला.