मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:ला शेतकरी म्हणवून घेतात. मात्र, त्यांना गाईच्या धारा कशा काढतात हे तरी माहिती आहे का, अशी खिल्ली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कामशेत येथील जाहीर सभेत बोलताना उडवली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली, त्यास मुंडे यांनी सभेतून प्रत्युत्तर दिले. मुंडे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे वय काय आहे आणि ते काय बोलतात, याची त्यांना लाज वाटली पाहिजे. शरद पवार यांची करंगळी धरून राजकारणात आल्याचे तुमचे गुरू सांगतात. पवारांवर टीका करताना त्या राजकीय गुरूंना मुख्यमंत्र्यांनी विचारणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री तोतऱ्या भाषेत ‘शुभम् करोती’ म्हणत होते, तेव्हा पवार मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी संपवण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. प्रत्यक्षात त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मुख्यमंत्री स्वत:ला शेतकरी म्हणवतात. ते खरेच शेतकरी असतील, तर त्यांच्या घरी दुभती गाय घेऊन जातो. गाईच्या धारा कशा काढतात, हे त्यांनी दाखवून द्यावे आणि स्वत: शेतकरी असल्याचे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.