पुण्यातील कचराप्रश्नी सत्ताधारी भाजपची विरोधकांनी चांगलीच कोंडी केली आहे. पुणेकरांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांसोबतच राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेदेखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पुण्यातील कचऱ्याच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना कचरा भेट देत निषेध नोंदविला.कचराप्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा निदर्शनास आणले. कपिल शर्माच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. मात्र, कचराप्रश्नी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला त्यांना वेळ नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
कचराप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना मेन्शन करून ट्विट केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. मुख्यमंत्री पुण्यातील कचऱ्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादीसोबत भाजपचा मित्रपक्ष असणारा शिवसेना देखील कचराप्रश्नी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मनसेनंतर शिवसेनेने पुण्यात कचरा फेको आंदोलन केले. यावेळी महापौर आणि पालकमंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, भाजप पुणे शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून हा कचरा प्रश्न भीषण झाला असताना महापौर आणि पालकमंत्री पुणेकर जनतेला कचऱ्यामध्ये सोडून परदेशात जातात. ही निषेधार्थ बाब आहे. पुणेकरांचा हा प्रश्न लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ‘पुण्यात कचरा अच्छे दिन विसरा’, असे फलक दाखवून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

 

shivsena

पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील डेपोमध्ये टाकला जातो. मात्र, याठिकाणच्या ग्रामस्थ शहरातील कचरा कचरा टाकण्यास विरोध करत आहेत. कचराप्रश्नी महापौर, महापालिका आयुक्तांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे या चर्चा निष्फळ ठरल्या. शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असताना महापौर आणि पालकमंत्री परदेशी दोऱ्यावर गेल्याचे सांगत विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे यांच्यानंतर आता राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने कचराप्रश्नी आंदोलन छेडले आहे. शिवसेनेच्यावतीने महापालिकेत कचरा टाकून भाजपच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुण्यात कचरा हेच का अच्छे दिन अशा घोषणा देखील देण्यात आल्या.