‘राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारामुळे पालिकेची प्रतिमा डागाळली होती’

पिंपरी महापालिका ही सर्वार्थाने शक्तिशाली महापालिका आहे. शहराची क्षमता मोठी आहे, त्यांनी ती क्षमता स्वत:साठी वापरावी, असे सांगत पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची प्रगती जास्त होऊ शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भोसरीत व्यक्त केला.

मध्यंतरीच्या काळात झालेल्या भ्रष्ट कारभारामुळे पालिकेची प्रतिमा डागाळली होती, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचा थेट नामोल्लेख टाळून केली.

भोसरी एमआयडीसी तसेच वडमुखवाडी येथील पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाटय़गृहाचे उद्घाटन, निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर कामाचे भूमिपूजन, जगताप डेअरी चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या कामाचा प्रारंभ एकत्रितरीत्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते.

पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गावांची एकत्रित महापालिका झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढला आहे. महापालिकेच्या विविध योजना, प्रकल्पांमुळे नागरिकांना उत्तम सुविधा प्राप्त होत आहेत. पिंपरीत चांगली कामे होत आहेत, यापुढेही आणखी चांगली कामे झाली पाहिजेत. नागपूर महापालिकेत नगरसेवक असताना १९९२ मध्ये आम्ही पालिकेचे प्रकल्प पाहण्यासाठी आलो होतो, तेव्हाच शहराची प्रगती दिसून आली होती. मध्यंतरी मात्र भ्रष्ट कारभारामुळे पालिकेची प्रतिमा डागाळली, दर्जा खालावला. पारदर्शक कारभार नव्हता. नागरिकांनी आता आपल्याकडे सत्ता दिली आहे, त्यामुळे पूर्वीप्रमाणे अपारदर्शी कारभार होता कामा नये. सर्व व्यवस्था लोकाभिमुख व्हायला हवी. राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. गावांप्रमाणे शहरांचाही विकास झाला पाहिजे. राज्य शासनाने शहर विकासाला तितकेच प्राधान्य दिले आहे.

केंद्राचा भरीव निधी शहरांना मिळतो आहे. शहर स्वच्छ असावे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे. नद्यांमध्ये सांडपाणी जाता कामा नये. बापट म्हणाले, मुंबईची गर्दी वाढल्यानंतर नव्या मुंबईला महत्त्व प्राप्त झाले. अगदी तसेच पुण्याच्या बाबतीत झाले आहे. पुण्याचे आकर्षण आता कमी होत चालले असून पिंपरी-चिंचवडला नागरिकांची अधिक पसंती मिळू लागली आहे. कार्यक्रमाचे स्वागत पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ व अण्णा बोदडे यांनी केले. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी आभार मानले.

पोलीस आयुक्तालय लवकरच

पुणे व पिंपरी-चिंचवड ही पूर्णपणे वेगळी शहरे आहेत. पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज आहे. या बाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाईल व शहरासाठी लवकरच आयुक्तालय दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.