छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री गुरुवारी (१९ फेब्रुवारी) येणार आहेत. या सोहळ्यानिमित्त शिवउत्सव समितीच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्ष व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) सकाळी शिवाई देवीला अभिषेक महसूल आयुक्त एस. चोकिलगम तसेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवकुंज इमारतीपर्यंत पालखी मिरवणूक, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम, राज्य शासनाच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच बालशिवबा यांना अभिवादन व त्यानंतर किल्ले परिसर विकासाची पाहणी असे नियोजन करण्यात आले
आहे.
या सोहळ्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्व खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
 त्यानंतर जुन्नर शहरातील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या शिवभक्तांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शिवउत्सव समितीतर्फे देण्यात येणारा ‘शिवनेर भूषण’ पुरस्कार यंदा वारकरी प्रबोधन काळात ५० वष्रे पूर्ण केल्याबद्दल ह.भ.प.राजाराम महाराज जाधव यांना जाहीर झाला आहे, असे सोनावणे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडावर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) शिवनेरीवरील शिवजन्मसोहळ्यासाठी दरवर्षी फक्त मर्यादित पासधारकांना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे अनेक शिवप्रेमींची निराशा होते. त्यात अनेक जण केवळ पास घेतात, मात्र गडावर येण्याचे टाळतात, अशी बाब लक्षात आल्यानंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे सूत्र या वर्षीपासून अवलंबिले जाणार आहे. अशाप्रकारचा निर्णय शिवउत्सव समिती व प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm fadnavis to attend chhatrapati shivaji birth anniversary at shivneri
First published on: 19-02-2015 at 03:05 IST