पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या ‘सीएम’ टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही नसेल, त्या सोसायट्यांना लक्ष्य करून ‘सीएम’ टोळी घरफोड्या करत असत असे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील आठ आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची उकल झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीएम टोळीचा म्होरक्या चंद्रकांत माने उर्फ अनंत माने याच्या नावाच्या शॉर्ट फॉर्ममुळे ही टोळी ‘सीएम’ (CM) टोळी म्हणून कुविख्यात होती. या टोळीतील चंद्रकांत उर्फ अनंत माने (२७), राजू शंभू देवनाथ उर्फ राजू बंगाली (२०), राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (२६) आणि अमोल उर्फ भेळ्या अरुण माळी उर्फ घुगे (२७) यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएम टोळी ही पिंपरी-चिंचवड शहरातील परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून घरफोड्या करत होती. सोसायटीच्या परिसरात ऑटो रिक्षाने फेरफटका मारून सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही नसल्याची खात्री करूनच संबंधित टोळी घरफोड्या करायची.

दरम्यान, पोलिसांना या टोळीचा मुख्य सूत्रधार चंद्रकांत माने आणि इतर तीन साथीदार हे उस्मानाबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून १९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यात ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदीचा समावेश आहे. चंद्रकांत मानेला २०१९ पासून दोन वर्षांकरिता तडीपार केलेले आहे. तर चारही आरोपींवर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण या हद्दीत तब्बल ७६ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने केली.