‘आधुनिक युगाच्या संता’ने काढली हवेतून साखळी
हवेतून नाणी, नोटा, अंगारा किंवा एखादा दागिना काढून भक्तांना प्रसाद म्हणून देण्यासारख्या हातचलाखीचे आणि बुवाबाजीचे बळी अनेक सामान्य लोक ठरतात. मात्र अशा प्रकाराला चक्क मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस पुण्यात बळी पडल्या आणि तेही एका शिक्षणसंस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात! या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या एका धार्मिक गुरूंनी फडणवीस यांना हवेतून साखळी काढून दिली आणि फडणवीस यांनी मोठय़ा भक्तिभावाने ती स्वीकारली.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कार सोहळ्यामध्ये फडणवीस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या समारंभात गुरुवानंद स्वामी यांना ‘सूर्यरत्न- आधुनिक युगाचे संत’ असा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक सत्यव्रत शास्त्री, माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ शास्त्रीय गायक राजन आणि साजन मिश्रा, डिझायनर दिलीप छाब्रिया, दूरचित्रवाणीवरील पत्रकार डॉली ठाकोर, गायक उदित नारायण, व्यावसायिक मोतिलाल ओसवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. या वेळी बँकिंग क्षेत्रातील सेवेबद्दल अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या अमृता फडणवीस यांचाही गौरव करण्यात आला. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींना यावेळी पुरस्कार देण्यात आले.
नक्की झाले काय?
पुरस्कार मिळालेल्या काहींनी गुरुवानंद यांचा आशीर्वाद घेतला. नमस्कार करणाऱ्यांना ते हवेतून खडा, मणी असे काढून प्रसाद म्हणून देत होते. या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात या धार्मिक गुरूंचे भक्तही उपस्थित होते. त्यांच्याकडून ‘बाबाजी की जय हो’ असा घोष केला जात होता. पुरस्कार समारंभात फडणवीस यांना गाण्याचा आग्रह झाला. ‘अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम्’ हे भजन सादर करून अमृता यांनीही गुरुवानंद यांना नमस्कार केला.
यावेळी अमृता यांना या बाबाजींनी हवेतून साखळी काढून दिली आणि त्यांनीही ‘बाबाजी की जय हो..’ च्या नारेबाजीत ती भक्तिभावाने स्वीकारली.